मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या काही दिवस अगोदर आणखी दोन करोनाबाधित आढळून आल्याने स्पर्धेचा मार्ग खडतर झाला आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकूण 72 खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यामुळे स्पर्धेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
ऑस्ट्रेलियान ओपन स्पर्धेसाठी खेळाडू आणि अन्य कर्मचाऱ्यांना घेऊन येणाऱ्या चार्टर्ड विमानामध्ये आज आणखी दोन करोनाचा संसर्ग असलेले रुग्ण आढळून आले आहेत. या प्रकारानंतर खबरदारीच्या पार्श्वभूमीवर 72 खेळाडूंना क्वारंटाइनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व खेळाडूंना 14 दिवस सक्तीने क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करावा लागणार असून त्यांना हॉटेलमधून बाहेर पडण्यासही निर्बध घालण्यात आले आहे. तसेच त्यांना सराव करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
“करोनाचा धोका लक्षात घेता आम्ही खेळाडू आणि आयोजकांना पूर्वीच कल्पना दिली होती. ही एक कठीण परिस्थिती असून पुढील काही दिवसांत परिस्थितीचा अंदाज घेण्यात येईल. तसेच क्वारंटाइनमध्ये असलेल्या खेळाडूंसाठी शक्य तितक्या आरोग्याची खबरदारी घेतली जात आहे.
– क्रेग टिले, स्पर्धेचे संचालक प्रमुख
याबाबत स्पर्धेच्या आयोजकांकडून पुष्टी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोहा येथून आलेल्या विमानात एक प्रवासी करोनाबाधित आढळला आहे. परंतु तो खेळाडूंच्या पथकाच्या संपर्कात नव्हता. यावेळी विमानातून 25 खेळाडूंसह 58 जण प्रवास करत होते. या सर्व 25 खेळाडूंना 14 दिवसांसाठी हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यापूर्वी स्पर्धेतील 47 खेळाडूंना शनिवारी क्वारंटाइन करण्यात आले होते. यात ग्रॅड स्लॅम विजेताही आहे.
दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेतील अन्य खेळाडूंना विशेष खबरदारी घेत पाच तासांचा सराव करण्यास मुभा देण्यात आली आहे. यासाठी खेळाडूंना कठोर अटी व पर्यवेक्षणाखाली प्रशिक्षणास परवानगी दिली आहे. दुसरीकडे काही अव्वल खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे, तर काही खेळाडू अद्याप ऑस्ट्रेलियात दाखल झालेले नाहीत.