‘एनआरसी’वरून पक्षांनी राजकारण करू नये’

भास्करराव आव्हाड : आयपीजे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे “एनआरसी’वर परिसंवाद

पुणे – देशामध्ये कायदेशीररीत्या नागरिक किती आहेत, हे प्रत्येक देशात तपासून पाहिले जाते. प्रत्येक देश आपल्या देशाची नियमित जनगणना करतो. भारतामध्ये दर दहा वर्षांनी अशी प्रक्रिया करण्यात येते. नागरिकत्व सुधारणा कायदा हा पूर्वीचा कायदा असून यामध्ये धर्माचा उल्लेख नव्याने टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व गोंधळ उडालेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आपापल्या परीने याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असून नागरिकत्व सुधारणा कायदा वरून होणारे राजकारण चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ विधीज्ञ भास्करराव आव्हाड यांनी व्यक्‍त केले.

आयपीजे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नागरिकत्व सुधारणा विधेयकाविषयी आयोजित परिसंवादामध्ये ऍड. आव्हाड बोलत होते. त्यावेळी उद्योजक अजय शिर्के, ट्रस्टचे विश्‍वस्त ऍड. शिवराज कदम जहागिरदार, ऍड. नीला गोखले आदी उपस्थित होते.

ऍड. आव्हाड म्हणाले, जगामध्ये अस्थिरता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे बेकायदेशीररीत्या स्थलांतरही वाढत आहे. अशा लोकांना गोळ्या घालण्याचे आदेश अमेरिकेमध्ये आहेत; परंतु आपण मानवतेच्या दृष्टीने त्याचा विचार करतो. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांनी मुस्लीम धर्म आपल्या देशाचा धर्म म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे अशा देशांमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लीम व्यतिरिक्‍त इतर धर्मियांना संरक्षण देण्यासाठी म्हणून हा कायदा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या कायद्याचा अधिक सखोल अभ्यास झाला पाहिजे. तसेच देशामध्ये बेरोजगारी, अर्थव्यवस्थेसंदर्भात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या तीन ते चार वर्षांमध्ये ती आणखी गंभीर होण्याची शक्‍यता आहे.

देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी म्हणून अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. जर तरुणांना नोकरी आणि व्यवसाय नसेल, तर त्यांना भरपूर रिकामा वेळ राहतो आणि अशा वेळेस त्यांना भडकवणारे खूप लोक असतात. त्यामुळे तरुणांना सकारात्मक दिशा देण्यासाठी म्हणून रोजगार अधिक निर्माण होणे आवश्‍यक आहे.
– अजय शिर्के, उद्योजक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.