ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना बंदी कायम; खेळणी, ओपन जीम, बेंच वापरास मनाई
पुणे – शहरात लॉकडाऊन तीन टप्प्यात शिथिल करण्यात येत असताना महापालिकेने गुरुवारी सकाळपासून 31 उद्याने सुरू केली. मात्र, पावसामुळे तसेच या निर्णयाची माहिती नसल्याने बहुतांश उद्यानांमध्ये कोणीही फिरकले नाही. दरम्यान, चालणे आणि धावणे या दोनच गोष्टींसाठी जाता येणार आहे. उद्यानात गेल्यानंतर बसण्यासाठी बाकडे, हिरवळ, ओपन जीम तसेच इतर सुविधांचा वापर करण्यास मनाई असल्याची माहिती उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.
राज्य शासनाकडून लॉकडाऊन शिथिल करताना नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळी मॉर्निंग वॉकला मुभा दिली. त्याच धर्तीवर महापालिकेनेही नागरिकांना सकाळी चालण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन बाहेर असलेली तसेच मोठे जॉगिंग ट्रॅक असलेली 31 उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सकाळी 6 ते 8 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत ही उद्याने सुरू केली. मात्र, त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांना केवळ धावणे आणि चालणे यासाठीच उद्यानात जाता येणार आहे. या शिवाय, इतर कोणत्याही सामूदायिक उपक्रमांसाठी वापरता येणार नाही. तसेच, नियमभंग झाल्याचे दिसल्यास उद्याने तत्काळ बंद केली जाणार आहेत.
ही उद्याने झाली सुरू…
स्व. दामोदर रा. वागस्कर उद्यान, मंगल प्रकाश उद्यान, आयप्पा उद्यान, लुंबिनी उद्यान, प्रगती उद्यान, कै. रोहन जगदीश शिंदे उद्यान, सुरेंद्र हंसराज आनंद उद्यान, स्वामी विवेकानंद उद्यान (जॉगर्स पार्क), उडान जैवविविधता उद्यान, कै.दामोदर रावजी गलांडे पाटील उद्यान व जॉगिंग पार्क, कै. मे. भास्कररावजी सखोजीराव शिंदे उद्यान, राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान,कै. मारुतराव गायकवाड उद्यान, कै. संजय महादेव निम्हण उद्यान, कै. विठोबा बाळाजी मुरकुटे उद्यान, जयभवानी उद्यान, पंचवटी वनीकरण, छ. संभाजीराजे उद्यान, कमला नेहरू पार्क, हिरवाई उद्यान, भारतरत्न पं. भिमसेन जोशी उद्यान, कै. तात्यासाहेब थोरात उद्यान, शहिद मे. प्रदीप ताथवडे उद्यान, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, कै. पृथक बराटे उद्यान, कै. राजा मंत्री उद्यान, कै. आमदार बाबुराव वाळवेकर उद्यान, अहिल्याबाई होळकर उद्यान, सिंहगड विकास उद्यान, शहीद हेमंत करकरे उद्यान, स्वामी विवेकानंद उद्यान.
मास्क घालणे बंधनकारक
उद्याने सुरू केली असली तरी 65 वर्षांवरील नागरिक आणि 10 वर्षांच्या आतील मुले, गर्भवती महिला यांना प्रवेश दिला जाणार नाही. या वयोगटातील व्यक्तींना केवळ वैद्यकीय कारणास्तवच बाहेर पडण्यास मुभा आहे. त्यामुळे त्यांना उद्यानात प्रवेशबंदी असणार आहे. याशिवाय, उद्यानात मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.