अपघात झाल्याने 16 वर्षीय मुलाच्या हातापायाच्या हरवल्या होत्या संवेदना
शस्त्रक्रिया केल्यानंतर तीन महिन्यांनी मिळाली पायांना ताकद
पिंपरी – मानेजवळील अत्यंत महत्त्वाच्या मणक्याला दुखापत झाल्याने 16 वर्षीय मुलाच्या हातापायाच्या संवेदना हरवल्या. अनेक तपासण्या व डॉक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगण्यात आले. मात्र, त्यासाठी 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च येणार असल्याने आई वडिलांनी हाय खाल्ली. आकुर्डी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये या मुलावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर एकुलता एक मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला हे पाहून आईवडिलांना अक्षरशः आकाश ठेंगणे झाले.
सोमटणे फाटा येथील शेतकरी कुटुंबातील दत्ता सुतार हा सोळा वर्षीय मुलगा 3 महिन्यांपूर्वी झाडावरून खाली पडला. उंचावरून पडल्यामुळे दत्ताच्या मानेजवळील अत्यंत महत्त्वाच्या मणक्याला मोठी दुखापत झाली होती. यामुळे मानेजवळील मणक्यावर मोठा ताण आल्याने हातापायाची संवेदना हरवली. दत्ताला चालता येणे मुश्कील झाले होते.
दत्ताला तातडीने सोमटणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एक्सरे, सिटी स्कॅन, एमआयआर असे प्राथमिक उपचार केल्यानंतर दत्ताची मानेजवळील शस्त्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला देण्यात आला. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी 4 ते 5 लाख रुपये खर्च येईल असे डॉक्टरांनी सांगितले. मुलाची अवस्था आणि खर्चाचा आकडा एकूण आई वडिलांनी अक्षरशः हाय खाल्ली. त्यांनतर सुतार कुटुंबीयांनी दत्ताला आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलमध्ये दाखविले.
ज्येष्ठ सर्जन डॉ. अमित वाघ यांचा सल्ला मागितला व आपली आर्थिक परिस्थितीदेखील सांगितली सर्व परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. वाघ यांनी दत्तावर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत किचकट असणारी ही मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. तब्बल तीन महिन्यांनंतर दत्ताला चालता येणे शक्य झाले आहे. स्टार हॉस्पिटलमध्ये यासाठी कोणतेही बिल आकारण्यात आलेले नाही.
मणक्याची शस्त्रक्रिया जोखमीची – डॉ. वाघ
मणक्याची विशेषतः मानेजवळील मणक्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे असते. दत्ताच्या बाबतीतही ही जोखीम होती. ती आम्ही स्वीकारली आणि यशस्वी झालो आहोत. येत्या काही काळात दत्ता पुन्हा पूर्वीसारखा चालू शकणार आहे, असे ज्येष्ठ सर्जन डॉ. अमित वाघ म्हणाले.
डॉक्टर नव्हे देवदूत भेटले
मुलाला निपचित पडलेले पाहून आमच्यावर मोठे संकट कोसळले. आम्ही शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातील त्यामुळे पैशांचाही मोठा प्रश्न होता. अशा वेळी स्टार हॉस्पिटल आणि येथील डॉक्टर आम्हाला देवदूत म्हणून भेटले. आमच्या मुलाला त्याचा पायावर उभे केले, त्याचे विस्कटलेले आयुष्य पुन्हा सावरले आहे, अशा भावना दत्ताच्या आईवडिलांनी व्यक्त केल्या.