मायणी -राज्य शासनाच्या वतीने अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीच्या (2021) ऑनलाइन प्रवेश परीक्षेत येथील भारतमाता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी सचिन गणेश सुगदरे याने 100 टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
मायणी येथील जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील सचिन याचे वडील पेंटरचे काम करतात. आई घरकाम करते. शाळा शिकून मोठा हो एवढीच आई व वडिलांची इच्छा होती सचिननेही आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरला नाही.
केवळ असेल त्या पुस्तकातील व नोट्सचा अभ्यास करून शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सचिनने हे यश संपादन केले. सचिन म्हणाला, “करोना परिस्थिती असतानाही शिक्षकांनी ऑनलाइन अभ्यास पूर्ण करून घेतला होता. घरी बसून ऑनलाइन तासिका, सराव परीक्षा हे थोडे नवीन होते. परंतु, समोर ठेवलेले ध्येय आणि जिद्द यश देते. हे उद्दिष्ट समोर ठेवून हे यश संपादन केले. आता पहिले ध्येय सर्वोच्च संस्थेत प्रवेश मिळविणे हे आहे.”
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, सचिव सुधाकर कुबेर, सर्व संचालक, प्राचार्य विजयकुमार पिसाळ, उपप्राचार्य संजय काळे, उपमुख्याध्यापक प्रकाश शिंदे, पर्यवेक्षक महेश तांबवेकर व सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले. प्राचार्य व शिक्षकांनी त्याच्या घरी जाऊन त्याचा सन्मान केला.