अदनान सामीच्या पुरस्कारला राष्ट्रवादीचा विरोध
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष करेल त्याला या देशात नागरिकत्वासह पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाते. केंद्र सरकारने पाकिस्तानी गायक अदनान सामीला पुरस्कार देऊन भारतीयांचा अपमान केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या पुरस्काराला विरोध केला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री या पुरस्कारांची घोषणा केली. अलिकडेच भारतीय नागरिकत्व लाभलेले अदनान सामीला पद्मश्रा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने केंद्र सरकरावर टीका केली आहे. अदनान सामी यांना पद्मश्री दिल्याने भाजपाची नीती स्पष्ट होत आहे. मोदी आणि भाजप विचार करते त्यावेळी पाकिस्तानी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळते आणि त्या व्यक्तीला पद्मश्रीने सन्मानित केले जाते, परंतु जे भारतीय आहेत त्यांना भारतीयत्व सिद्ध करावे लागते, असा टोला मलिक यांनी लगावला.
तुम्ही भाजपच्या विरोधात असाल तर तुम्हाला सन्मान नव्हे, मारहाण केली जाईल. पाकिस्तानी कालाकाराला पुरस्कार देऊन मोदींचा खरा चेहरा समोर आला आहे. सामीला दिलेला पुरस्कार हा देशातील जनतेचा अपमान आहे, असेही मलिक म्हणाले.
सामीचा पुरस्कार रद्द करा!
मनसेनेही सामीच्या पुरस्कारावरून टीका केली आहे. मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीाला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये. सामीला देण्यात आलेल्या पुरस्काराचा मनसे निषेध करते. सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरीत रद्द करावा, अशी मागणी मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली आहे.