चेन्नई – महेंद्रसिंग धोनीच्या शिवाय चेन्नई सुपर किंग्जची कल्पनाच करता येणार नाही, असे या
संघाचे मालक आणि इंडिया सिमेंटसचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीनिवासन
यांनी म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष असणारे श्रीनिवासन यांच्या मते महेंद्रसिंग
धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्ज असूच शकत नाही त्याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्ज शिवाय धोनी
कुठेही असणार नाही. त्यांच्या या विधानाने सीएसके आणि भारताचा सार्वकालिक सर्वश्रेष्ठ
क्रिकेटपटू धोनी यांच्यातील नाते किती गहिरे आहे स्पष्ट होत आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके ने चौथ्यांदा इंडिनय प्रीमियर लीग चाम्पियनशिप पटकावलेली
आहे. त्यामुळे आयपीएल ट्रॉफी घेऊन श्रीनिवासन भगवान वेंकटचलपती मंदिरात आले होते.
त्यांच्या मते धोनी हा सीएसके संघाचा, चेन्नई आणि तमिळनाडूचा अविभाज्य भाग आहे.
सीएसकेशिवाय धोनी असू शकत नाही आणि धोनशिवाय सीएसके.
आयपीएल सुरु झाल्यापासून म्हणजे 2008 पासून 2014 पर्यंत सीएसके संघाची मालकी
इंडिया सिमेंटस् लिमिटेडकडे होती. 2014 पासून संघाची मालकी चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट
लिमिटेड या कंपनीकडे आहे. धोनी आणि संघाचे मूल्य इतके आहे की, चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट
लिमिटेड कंपनीचा आयपीओ येण्याची अनेक गुंतवणूकदार वाट पहात आहेत.
आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा विजय चेन्नईमध्ये केव्हा साजरा करण्यात येणार यावर
ते म्हणाले की, धोनी सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मेन्टॉर म्हणून टी-ट्वेन्टी विश्वकरंडक
स्पर्धेत व्यस्त आहे. तो परत आल्यावर चेन्नईत होणाऱ्या कार्यक्रमात आयपीएल ट्रॉफी
त्याच्यासमवेत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासमवेत शेअर केली जाईल. एम. ए. चिदंबरम
स्टेडियमवर हा कार्यक्रम होईल.
श्रीनिवासन हे तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या विश्वस्त मंडळाचे सदस्यही आहेत. भगवान वेंकटश्वराच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रम केल्यानंतर त्यांनी आयपीएल ट्रॉफीचा स्वीकार केला.