बंधाऱ्याला खेटून असलेली चौकी कोसळली

पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा अभाव : कर्मचाऱ्यांचा निवारा हिरावला

निमसाखर- निमसाखर (ता. इंदापूर) येथे काही अंतरावर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे. यालगत जलसंपदा खात्याची आवश्‍यक साहित्य व कर्मचाऱ्यांसाठी ही चौकी बांधली होती. चौकी मध्यंतरीच्या काळात पूरस्थितीत लाखो रुपयांच्या निधीचा वापर करून बांधलेली पण खात्याच्याच दुर्लक्षामुळे चौकी नीरा नदीत कोसळली आहे. पाटबंधारे विभागाने दक्षता घेतली नसल्यामुळे ही इमारत भुईसपाट झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा निवारा हिरावला आहे.

निमसाखर भागातील शेतकऱ्यांनी नीरा नदीवरून उपसा सिंचनाव्दारे चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यत पाईपलाईन केली आहे. या पाण्याच्या माध्यमातून शेती ओलिताखाली आली आहे. पाटबंधारे खात्याकडून पासेसवरही शेती ओलिताखाली येते. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, मका, हरभरा यासह अन्य पिके घेतली आहेत. मध्यंतरीच्या काळात झालेल्या पावसामुळे भाटघर धरण साखळीतील तिन्ही धरणे भरली होती. निमसाखरपासून केवळ चार किलोमीटर अंतरावर पळसमंडळ (ता. माळशिरस) बंधारा आहे.

या बंधाऱ्यावरून पाणी वाहिले. या पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे निमसाखर बाजूच्या बंधाऱ्याचा भराव वाहून गेला आहे. नंतरच्या काळात पावसाच्या विश्रांतीनंतर नागरीकांनी तात्पुरते जाण्यापुरते मुरमीकरण केले. बंधाऱ्यालगत पाटबंधारे खात्याची बावीस वर्षांपासून दुर्लक्षित लाखो रुपये खर्चून बांधलेली स्लॅबची इमारत होती. इमारतीच्या मागील बाजूला नीरा नदी आहे. पूर्वी पंचवीस वर्षापूर्वी पंधरा फुटापर्यंत मातीचा भराव होता. सात वर्षापूर्वी आलेल्या पूरस्थितीमुळे इमारतीच्या मागील पायाबरोबरीचा भराव वाहून गेला होता. पाटबंधारे खात्याने सिमेंट बांधकाम करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.