रोम – करोना विषाणूचा प्रादुर्भाव आशिया, मध्यपूर्व आणि युरोप खंडभर पसरल्यामुळे आता जगभर करोनाची भीती निर्मांण व्हायला लागली आहे. सध्या या विषाणूचा प्रादुर्भाव 80 पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. सौदी अरेबियाने मक्का मदिनाची वार्षिक यात्रा स्थगित केली आहे.
इराणने शुक्रवारच्या प्रार्थना सलग दुसऱ्या आठवड्यातही रद्द केली आहे. इटलीमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली असून पुढील दोन आठवडे सर्व सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षकच नसल्याने इटली सरकारने फुटबॉलसह सर्व क्रीडा स्पर्धाही 3 एप्रिलपर्यंत स्थगित केल्या आहेत. करोनामुळे चीन पाठोपाठ इटलीमध्ये सर्वाधिक 108 बळींची संख्या तर 3 हजार जणांना प्रादुर्भाव झाला आहे.
दक्षिण कोरियामध्ये करोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आयुष्यावर यापूर्वीच परिणाम झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यो झाला असून इराणमध्येही 92 जणांचा बळी गेला आहे. जगभर तब्बल 3,200 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 95 हजार जणांना करोनाची लागण झाली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
परंतु बहुतेक कमी प्रभावी प्रकरणी नोंद ठेवली गेलेली नसावी, त्यामुळे ही आकडेवारी संशयास्पद आहे, असे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे. गेल्या आठवड्यात न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या डेटाच्या अभ्यासानुसार 30 हून अधिक चीनी प्रांतातील मृत्यूचे प्रमाण 1.4 टक्के आहे.
दक्षिण कोरियामध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी हॉस्पिटल अपुरी पडू लागल्याने रुग्णांची अन्यत्र सोय करावी लागली आहे. नागरिकांनी अभिवादन करताना “शेक हॅन्ड’ करू नये, एकमेकांचे चुंबन घेऊ नये आणि सावधगिरीचा उपाय म्हणून दुरूनच “नमस्कार’ करावा, असे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी केले आहे.
चीनमधील मृत्यूचा आकडा 3 हजाराच्या पुढे
चीनमध्ये गुरुवारी करोनाची लागण झाल्याची 139 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि 31 जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये एकूण 80,400 करोनाची बाधा झाली असून 3,012 मृत्यूची नोंद झाली आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या हुबेइ प्रांतामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. हॉस्पिटलमधून उपचार घेऊन 1,923 जणांना घरी पाठवण्यात आले आहे.