फास्टर फेणे ही मराठी भाषेतील प्रचंड लोकप्रिय ठरलेली पहिली बाल साहस कादंबऱ्यांची मालिका असून या पुस्तकांचे लेखन प्रसिद्ध मराठी लेखक भास्कर रामचंद्र भागवत ऊर्फ भा. रा. भागवत यांनी केले आहे.
या मालिकेत एकूण 20 पुस्तके असून आता ही ओरिजनल पुस्तके ऑडिओ फॉरमॅटमध्ये स्टोरीटेल’ खास उन्हाळी सुट्टीनिमित्त खास छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहे. “फास्टर फेणे’ लोकप्रिय गुप्तहेर पात्रांपैकी एक असून दूरदर्शनवर झालेल्या मालिकेत सुमीत राघवनने तर चित्रपटात अमेय वाघने फेणेची भूमिका केली होती.
आता त्याच्याच लोकप्रिय आवाजात ही ऑडिओबुकची मालिका “स्टोरीटेल’ने बालदोस्तांसाठी आणली आहे. या पुस्तक मालिकेत 20 पुस्तकांचा समावेश आहे. फास्टर फेणेच्या साहसी कथा प्रामुख्याने पुणे व आसपासच्या परिसरात घडतात. मात्र काही कथांमध्ये मुंबई, काश्मीर, इंडो-चायना बॉर्डर इतकेच नव्हे तर अफगाणिस्तानमध्ये देखील साहसी कृत्ये करताना दिसतो.
अमेय वाघ याच्या आवाजातील डिजिटल ऑडिओ कथा ऐकताना मुलांना खूप मजा येणार आहे. “स्टोरीटेल’च्या या ऑडिओबुकमुळे बच्चेकंपनीचे समर व्हेकेशन द्विगुणित होणार असून त्यांची ही उन्हाळी सुट्टी विशेष ठरणार आहे.