तहसीलदारांचा आदेश बासनात गुंडाळला

महिनाभरानंतरही अतिक्रमणावर कारवाईला बगल : बाधित शेतकऱ्यांतून संताप

सोरतापवाडी – हवेली तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये परतीच्या पावसामुळे मागील महिन्यात पिकांचे व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ओढे, नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर तहसीलदारांनी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, हा आदेश बासनात गुंडाळला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वादळी पावसाने उसासह मका, कांदे, बाजरी पिकांचे नुकसान झाले होते. ओढ्यावरील अतिक्रमणामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. महसूल प्रशासनाने केलेल्या पाहणीत ओढे व नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने शेतकरी व सर्वसामान्यांचे नुकसान झाल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित गावच्या तलाठ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती संकलीत झाल्यानंतर ज्यांनी अतिक्रमण केले आहे.

त्यांना ते काढण्यासाठी नोटीसीद्वारे मुदत देण्यात आली होती. परंतु मुदतीत अतिक्रमण न काढल्यास ते महसूल यंत्रणेद्वारे हटवले जाईल. हा खर्च संबंधित व्यक्‍तीकडून वसूल करण्यात येणार आहे, असा इशारा हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिली होता. मात्र, अद्याप यावर कारवाई शून्य आहे. तहसीलदारांच्या आदेशाला अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी धाब्यावर बसविले आहे.

वादळी पावसामुळे गावांमधील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. परंतु स्थानिक जागा भूखंड माफियांनी अतिक्रमण करून नैसर्गिक ओढे, नाले बुजवून टाकले आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशावेळी अनेक राजकीय पुढाऱ्यांनी या भागात दौरे केले. मदतीचे आवाहन केले. त्यांची मदत तर पोहचली नाहीच. परंतु हवेली तहसीलदार सुनील कोळी यांनी बाधित क्षेत्राचा दौरा केल्यानंतर स्थानिकांना शब्द दिला होता की, ज्यांनी ओढ्या, नाल्यांवर अतिक्रमण केले आहे. त्यांच्यावर कारवाई करू. परंतु महिना उलटून गेला तरी महसूल विभागात काहीच हालचाल दिसत नाही. राजकीय नेत्यांप्रमाणेच आता प्रशासकीय अधिकारी आश्‍वासन देऊन विसरू लागले की काय, अशी चर्चा नागरिक करीत आहेत.

प्रत्यक्ष शेतीचे झालेले नुकसान व नुकसानभरपाईच्या नावाखाली झालेले पंचनामे किती फसवे आहेत, हे शेतकऱ्यांना समजले आहे. निदान आर्थिक मदत तर नाही. भविष्यात असे संकट उभे राहू नये म्हणून तरी अतिक्रमणाला आळा तरी घालावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आम्ही सुखासमाधानाने शेती तरी करू शकू, असे शेतकरी वर्गाचे मत आहे. पूर्व हवेलीत जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे अनधिकृत असतानाही भूखंड माफिया या जमिनींची तुकडे पाडून प्रसंगी कमी पडली तर ओढे, नाले बुजवून गायरान लाटून देवस्थानाच्या जमिनी गिळंकृत करून तर विविध वतने काढून लिलाव करीत आहेत.

राजकीय नेत्यांप्रमाणे महसूल प्रशासनाकडून आश्‍वासन

अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईला बगल

हताश शेतकरी
पूर्व हवेली तालुक्‍यात शेतीची वाट लागली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे तहसीलदारांनी पाहणी दौऱ्यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देत कारवाईबाबत ग्वाही दिली होती. आता कारवाई होईल, असे वाटत होते. परंतु पुन्हा मोठ्या पावसाची वाट पाहावी लागणार काय, असा मार्मिक टोला बाधित शेतकरी राजू काळभोर, माऊली माथेफोड, सागर राखपसरे, लाला राखपसरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.