स्त्रियांना आवडणारी एकच गोष्ट…खरेदी

घरातून पाय बाहेर पडले की ते आपोआप थांबतात, ते कशासाठी… खरेदीसाठी. किराणा दुकान असो… मॉल असो… की अगदी गावाकडची जत्रा, यात सगळ्यात महत्त्वाचा हिस्सा असतो स्त्रियांसाठी असलेल्या वस्तूंचा. या ठिकाणी तासन्‌तास न कंटाळता, न थकता भरपूर वस्तू खरेदी केल्यानंतरच स्त्रियांच्या चेहऱ्यावर फुलते… स्मित हास्य…

जत्रेमध्ये फेरफटका मारताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की अशा जत्रेत स्त्रिया आणि मुलांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी जास्त प्रमाणात असतात, पुरुषांसाठी खवैय्येगिरी पुरेशी असते. स्त्रियांसाठी दागदागिने आणि कपड्यांचे, साड्यांचे स्टॉल भरपूर होते आणि मुलांसाठी खाऊ आणि खेळणी… पाच दिवस नुसती धम्माल चालली होती. माझी मैत्रीणच रोज हजार रुपयांची खरेदी करत होती. कानातले, गळ्यातल्या माळा, विविध मंगळसूत्रं, बांगड्या, ड्रेस मटेरियल, रेडिमेड ड्रेस आणि साड्याही, क्‍लिपा, मोत्याच्या वेण्या, अंगठ्या, नथ, मोत्याच्या कुड्या, शिवाय कुरड्या, पापड्या, पापड, मसाले, स्वेटर, शालीपासून सगळे खरेदी करत सुटली जणू परत कधीच ते मिळणार नाही अशा थाटात आणि रोज पाच दिवस विविध प्रकारची खरेदी आणि घरी स्वयंपाक नको म्हणून जाताना बिर्याणी, भरले वांगे, भाकरी वडे वगैरे खरेदी शिवाय तिथे पाणीपुरी, चायनीज, वडापाव, मुगभजी, आप्पे, सॅंडविच हे वेगळेच. मला फार गंमत वाटली तिची. हा भुलभुलैय्या तिच्यासाठी नवीनच होता आणि शिवाय पर्स (खिसा) गरम. रोज मी तिच्या सोबत असल्यामुळे हे सारे पाहत होते. खरच हं! आणि वेगवेगळ्या मनिपर्स, बॅग, प्रवासी बॅग, पिशव्या यांची खरेदी वेगळीच.

स्त्रियांचा हाच मोह ओळखून मोठे व्यापारी त्यांना आकर्षित करणाऱ्या जाहिराती आणि उत्पादने बाजारात आणीत असावेत. अशा ठिकाणी जत्रेत एखादी स्त्री गेली आणि काही न घेता तशीच बाहेर आली असे होतच नाही, नाही का? म्हणून चतुर पुरुष अशा ठिकाणी वाटेवर स्त्रियांना बरोबर जाणे चतुराईने टाळतात. अहो, एकेका स्टॉलवर 15/20 मिनिट म्हटलं तरी दोन ते अडीच तास आरामात जातात. शिवाय ती स्त्री चेंगट असेल तर 3/4 तास आरामात जातात. एव्हढे पेशन्स असणारा पुरुष सापडणे कठीणच! तर मोहावरून आठवलं, कुणाला कशाचा मोह वाटेल सांगता येणार नाही. किराणा मालाच्या दुकानात देखील हल्ली आकर्षक पॅकिंगमध्ये नवीन नवीन उत्पादने ठेवलेली असतात एक वस्तू घ्यायला गेलेली व्यक्ती चार वस्तू घेतल्या शिवाय बाहेर पडत नाही.

परवा मीच किराणा दुकानात दूध आणायला गेले होते. हल्ली किराणा दुकान म्हणजे ऑल इन वन झालंय. भाजी, दुधासकट सर्व मिळते. दूध घेऊन बाहेर पडणार तेव्हढ्यात एका बरणीवर लक्ष गेले. आकर्षक बरणी आणि त्यात छोटे छोटे चॉकलेट सारखे काहीतरी होते. म्हणून दुकानदाराला सहज विचारले, “काय आहे ते पाहू बरं?’ त्या बरणीमध्ये छोटे छोटे गुळाचे तुकडे ढेपेच्या आकाराचे होते. गुळाच्या सर्व तुकड्याचे एकूण वजन 500 ग्रॅम आणि किंमत 90 रुपये! बापरे एरव्ही गूळ 80 रुपये किलो मिळतो आणि हा अर्धा किलो 90 रुपये. मग दुकानदाराने त्याचे गुण वर्णन करायला सुरुवात केली. हा स्पेशल ऑरगॅनिक गूळ आहे. औषधी आणि फायदेही कसे आहे तेही सांगितले. आम्ही बायका बऱ्याचदा बरण्या, डबे, बॉक्‍स यालाच फार भुलतो आणि खरेदी करतो.

लहानपणी मला बिस्कीट, चॉकलेट पेक्षाही बॉक्‍स आणि डबे आवडायचे. अजूनही आवडतात. खूप वेळा मी कॅडबरी, चॉकलेट्‌स आणि ड्राय फ्रुटस आकर्षक डब्यांसाठीच घेतले आहेत. तर सरते शेवटी दुकानदार जिंकला आणि अस्मादिक बरणीच्या आणि त्यातल्या छोट्या छोट्या गुळाच्या ढेपांना (ज्या एक एक चमचा गुळाच्याच असतील) भुलून खरेदी केला. जाऊ दे, विचार केला रोज जेवल्यानंतर एक ढेप (एक चमचा गूळ) खातेच तर बिनाकष्टाचा… रोज वरचा डबा काढा त्यातला गुळ काढा, तो फोडा, हात चिकट करा, हं, परत डबा जागेवर ठेवा, केवढा त्रास तो तरी वाचेल… बरणी उघडा, मस्तपैकी ढेप छोटीशी काढा आणि मजेत खा! आहे की नाही फायदाच फायदा… तर किम्मत सोडा फायदा पाहा… आपल्या मोहाला गोंडस नाव द्यायचं समाधान मानायचं! एक नूर आदमी दसनूर कपडा तसे एकनूर आदमी दसनूर मोहमाया और बिसनूर कस्टमरची नस जाणणारे व्यापारी.

अनुराधा पवार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.