बारामती प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीच्या दिलेल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांनी बारामती शहरातील सहयोग भवन या निवासस्थानासमोर अजित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
एकच वादा अजित दादा अशी घोषणाबाजी करत अजित पवार यांच्या पाठीशी बारामतीकर ठामपणे उभे असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाजप सरकारमधील ज्या नेत्यांमुळे अजितदादांच्या डोळ्यात अश्रु आले त्यांना महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही असा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणाशी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा कसल्याही प्रकारचा संबंध नसताना त्यांची ईडीच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. हे मनाला उद्विग्न करणारे आहे. आपल्यामुळे शरद पवार साहेबांची बदनामी होत असल्याची भावना माझ्या मनात आली. त्यामुळेच मी आमदारकीचा राजीनामा दिला. त्याबाबत कोणालाही सांगितले नव्हते. राष्ट्रवादीच्या नेत्यांची मी माफी मागतो. असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले यावेळी बोलताना ते भावुक झाले होते. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
अजित पवार यांच्या राजीनाम्याने बारामती अस्वस्थता पसरली होती. मात्र शरद पवार यांनी मनोमिलन केल्यानंतर अजित पवार यांनी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले आणि बारामतीतील अजित पवार समर्थकांनी एकच जल्लोष केला. एकच वादा अजित दादा अशा घोषणा देत त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दर्शिवला.