व्यासपीठावर एकी, तर बाहेर मात्र बेकी

अजूनही शिवसेना-भाजपचा सांधा जुळला नाही : आरपीआयच्या कार्यकर्त्यांची मेळाव्याला दांडी
प्रा. डी. के. वैद्य

अकोले – महायुतीच्या मेळाव्यात व्यासपीठावर “एकी’ दिसली पण मेळाव्यानंतर मात्र चित्र बेकीचे समोर आले. म्हणजेच शिवसेना व भाजप यांचा ऐक्‍याचा सांधा अजूनही जुळलेलाच नाही. दोन्ही पक्षांमध्ये हे गटबाजीचे चित्र असतानाच मेळाव्यात एका गटाला बोलण्याची संधी भेटते आणि दुसऱ्या गटाला भेटत नाही. या कारणावरूनही त्यांची सुंदोपसुंदी कायम राहिल्याचे उघड झाले. आरपी आयच्या कार्यकर्त्यांची गैरहजेरी महायुतीच्या फुग्याला टाचणी लावणारी राहिली.

राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्याला गर्दीचे प्रमाण अल्पच राहिले. खासदार सदाशिव लोखंडे शिवसेनेचे आणि ते युतीचे उमेदवार. मात्र भाषणांमध्ये ही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना डावलले गेल्याने त्याचे पडसाद मेळाव्यानंतर उमटले. ना.भुसे, आ.नरेंद्र दराडे, खा. लोखंडे, शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले यांची भाषणे म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांची भाषणे होती. नावाला औषध म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांचे भाषण झाले. तेही जोरकस आणि आक्रमक भाषण झाले. पण व्यासपीठावर त्यांच्याच पक्षाचे इतर नेते मात्र भाषणासाठी आमंत्रित केले गेले नाही. हे ही वास्तव उघड झाले. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, शिवाजीराजे धुमाळ, जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे, सुनीता भांगरे, डॉ.किरण लहामटे, नगरसेवक सोनाली नाईकवाडी या व अन्य मान्यवरांना बोलण्याची संधी मिळणे गरजेचे होते.पण तसे घडले नाही. याची मेळाव्यानंतर चांगलीच चर्चा रंगली.

मेळाव्यानंतर अशोकराव भांगरे, शिवाजीराव धुमाळ यांनी महेश नवले यांच्यावर व अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीकास्र सोडले. भांगरे म्हणाले, माजी मंत्री पिचड यांचे दोन समर्थक बोलले तेवढे बस झाले. आदिवासी भागात मतदार नाहीत काय? असा सवाल करून त्यांनी आपल्याला बोलण्याची संधी दिली नाही म्हणून नाराजी व्यक्त केली. तर मुलुख मैदानी तोफ शिवाजीराजे धुमाळ यांना बोलण्याची संधी मिळणे गरजेचे होते पण तसे न घडल्याने ते व त्यांचे समर्थक नाराज राहिले.
या मतदारसंघात 1957 साली बी. सी. कांबळे हे दलित खासदार निवडून आले होते. त्यानंतर 2009 साली हा मतदारसंघ राखीव झाला. पण आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांना मतदारांनी अस्मान दाखवले. त्यानंतर एकाही पक्षाने 2014 साली व आताच्या निवडणुकीत दलित समाजाला उमेदवारी दिलेली नाही. म्हणून आरपीआयच्या गटात व सर्वच दलित मतदारांमध्ये हे असंतोषाची खदखद आहे. आणि त्यामुळे आज आरपीआयचा एकही कार्यकर्ता या मेळाव्याला हजर नव्हता हे दिसून आले.

आजच्या मेळाव्याला भाजपचे अशोक भांगरे, शिवाजी धुमाळ, जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे, सुनीता भांगरे, डॉ. किरण लहामटे, सचिन तांबे, वसंत मनकर, सोनाली नाईकवाडी हे व अन्य तर शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, बाजीराव दराडे, कैलासराव शेळके, सभापती रंजना मेंगाळ, उपसभापती मारुती मेंगाळ, माधवराव तिटमे, रामहरी तिकांडे, लालूशेठ दळवी, आप्पासाहेब आवारी, नितीन नाईकवाडी हे व अन्य मान्यवर व्यासपीठावर एकत्र दिसले. मात्र त्यांच्यातील एकी किती? यापेक्षा बेकी का? याचा विचार प्रथम पक्षश्रेष्ठींना भविष्यात करावा लागणार आहे हे निश्‍चित. यावर वेळीच तोडगा काढण्याची गरज आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.