“एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले, तिथे १००…!”; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई : राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यात सातत्याने शाब्दिक वाद सुरु असल्याचे दिसून येते. त्यातच शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांविषयीच्या विधानावरून संजय राऊत यांनी हा टोला लगावला आहे. तसेच, चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या पत्राला देखील राऊतांनी उत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी “देवेंद्र फडणवीस असे १०० अजित पवार खिशात घेऊन फिरतात”, असं विधान केलं होतं. त्यावरून संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “पाटील म्हणतात शंभर अजित पवार घेऊन देवेंद्र फडणवीस फिरात. हे विधान गंमतीचंच आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या ७२ तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले.

तिथे शंभर अजित पवार भाजपाला कसे झेपणार? पण श्री पाटील यांनी महाराष्ट्राचं मनोरंजन करायचं ठरवलंच असेल, तर त्यांना कोण थांबवणार?” असा खोचक सवाल देखील संजय राऊतांनी केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आपल्या रोखठोक सदरात संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, राज्यात ईडीच्या कारवायांवरून देखील संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “ईडीच्या नावे धमक्या द्यायच्या आणि चिखलफेक करायची हेच चंद्रकांत पाटील यांचं काम. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांना टीका सहन करावीच लागते. वागताना, बोलताना तारतम्य ठेवावं लागतं. सामनातल्या एका अग्रलेखावर पाटील यांनी नाराजी व्यक्त करणारं पत्र पाठवलं. त्यात भूमिका कमी आणि जळफळाट जास्त आहे. लिहिताना, बोलताना भान सुटलं की स्वत:च्याच धोतरात लोक कसे पाय अडकून पडतात ते या पत्रावरून दिसतं”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत या लेखात म्हणतात, “करोनाचा कहर आणि लॉकडाउनचे निर्बंध कायम असले, तरी आपल्या देशातील राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच आहेत. लोक राजकीय बातम्यांमधून स्वत:चं मनोरंजन करून घेत आहेत. गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, विधाने पाहिली तर महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा, नाट्यगृहांची खरंच गरज आहे का? असे  वाटते. सर्वत्रच विनोद आणि रहस्यमय असं मनोरंजन सुरू आहे”.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.