टोकियो – करोनाचा धोका अद्याप कायम असला तरीही पुढील वर्षी ठरलेल्या वेळापत्रकानुसार टोकियो ऑलिम्पिक होणारच, असा ठाम विश्वास जपान सरकार व जपान ऑलिम्पिक संघटनेने व्यक्त केला आहे.
करोनाचा धोका अद्याप असला तरीही जनतेच्या मनात या स्पर्धेबाबत जी शंका निर्माण झाली आहे ती दूर करणे आमचे प्राधान्य आहे. स्पर्धेसाठी प्रचंड खर्च करण्यात आला असून देशात अनेक विकासकामेही करण्यात आली आहेत. सध्या स्पर्धेच्या तयारीचे काम पुन्हा एकदा हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी पुन्हा एकदा लाखो डॉलर्सचा निधी खर्च केला जाणार आहे. मात्र, तरीही जनतेच्या मनात ही स्पर्धा होईल की नाही अशी शंका आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना विश्वास देणे गरजेचे आहे, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे.
ही स्पर्धा मूळ वेळापत्रकानुसार गेल्या 24 जुलैपासून सुरू होणार होती व 9 ऑगस्टला संपणार होती. मात्र, त्याचवेळी करोनाचा धोका जगभरात प्रचंड वाढल्याने ही स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आली. आता नव्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणार आहे.