प्रशासनाची ग्वाही : पूल बचाव समितीच्या मागणीला प्रतिसाद
कराड – येथील जुना कृष्णा पूल पाडला जाणार नाही, अशी ग्वाही शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांनी आज पत्रकार, लोकप्रतिनिधी व नागरिक यांना प्रशासनाच्यावतीने दिली.
गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक जुना कृष्णा पूल पाडण्यात येणार असल्याची चर्चा शहरात सुरू होती. याबाबत कराड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.अशोक चव्हाण यांनी हा पूल पाडला जाऊ नये, यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार दि. 6 मे रोजी प्राथमिक बैठक घेण्यात आली. त्यानंतर दि. 8 मे रोजी पत्रकार, लोकप्रतिनिधी, नागरिक, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्ष, मान्यवर यांनी प्रत्यक्ष पुलाची पाहणी केली होती. त्यानंतर दि. 10 मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक होवून जुना कृष्णा पूल बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमार्फत संबंधित प्रशासकीय विभागांना निवेदन देण्याचा ठरावही संमत करण्यात आला. या सर्व बैठकांना कृती समिती सदस्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
जुना कृष्णा पूल पाडला जाऊ नये, यासाठी आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. त्याची प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने दखल घेण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याचे सुमारास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले, उपअभियंता रमेश पन्हाळकर, अभियंता अमर देशमुख, इलियास संदे, पोखरकर, कुलकर्णी यांनी पत्रकार, लोकप्रतिनिधी, संघटनांचे प्रतिनिधी व नागरिकांसमवेत पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बोलताना अशोक भोसले यांनी जुना कृष्णा पूल पाडण्यात येणार नाही, अशी ग्वाही देतानाच नवीन पुलाचे बांधकाम सुरू असताना सुध्दा लहान वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार नाही असे स्पष्ट केले. मात्र, अवजड वाहनांची वाहतूक नवीन पुलावरुन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तसेच या संदर्भात कृती समितीच्या सदस्यांबरोबर सामुहिक बैठक घेण्याचेही भोसले यांनी आश्वासन दिले. यावेळी कराडचे नगरसेवक सौरभ पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत यादव, शेतकरी संघटनेचे अनिलबापू घराळ, भाजपाचे पांडुरंग तवर, शिवसेना शहर प्रमुख शशिकांत करपे, सुधीर एकांडे, यांचेसह पत्रकार देवदास मुळे, गोरख तावरे, उमेश सुतार, अजिंक्य गोवेकर, समीर आराणके, सागर दंडवते, विशाल पाटील, सतिश चव्हाण तसेच शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.