अमोल मतकर
संगमनेर – राज्यात तंबाखूजन्य पदार्थ तसेच गुटखा विक्री करण्यास बंदी असली तरी महाराष्ट्रासह संगमनेर तालुक्यात सगळीकडे बिनदिक्कतपणे गुटखा प्रत्येक टपरी अथवा किराणा दुकानात मिळतो. यासाठी तालुक्यातील एक गुटखाकिंग पडद्याआडून भूमिका निभावत असून तालुक्यात सर्वत्र व्यवस्थित पुरवठा करण्यात यशस्वी होत असून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकण्याचे काम तो व्यक्ती करत असल्याची जोरदार चर्चा आहे.
संगमनेर तालुक्यात साधारणपणे 35 ते 40 पोते गुटखा रोज लागत असतो. त्या प्रक्रियेत काही जुने मातब्बर मंडळी काम करत होते. त्यातल्या एका पाटलाने “मी नाही त्यातला’ या प्रमाणे पडद्याआडून सगळी सूत्रे हातात घेतली. फक्त रोज संध्याकाळी शहरात बस स्थानक परिसरात वसुलीसाठी काळ्या गाडीत येऊन गाठोडे घेऊन जातो. प्रशासनाच्या काही खालच्या लोकांना हाताशी धरून आणि अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ टाकत हा धंदा सुरू आहे.
काही गुटखा तस्करांची साखळी दैनिक प्रभातच्या हाती लागली असून मुख्य सूत्रधाराला प्रशासन कधी ताब्यात घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. संगमनेर तालुक्यात घुलेवाडीचा पंटर सिन्नर तालुक्यातील दापूर येथून, करूले गावातील पंटर कोपरगाव येथून, तळेगाव दिघे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा येत आहे. नगरहून शहरातील जोर्वे नाका येथील दोघे जणांना श्रीरामपूर, चंदनापुरी येथील पंटरला घारगावहून तर निमगाव पागा आणि पेमगिरीला कोतूळहून गुटखा पुरविला जातो.
संगमनेर शहरातील तेलीखुंट, कुंभार आळा, बुद्ध विहार शेजारी, मालदड रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये, पद्मानगर, गणेश विहार, राजापूर गावात दोघे जण, अकोले नाका, सिकची हॉस्पिटल जवळ, पोलीस स्टेशनसमोर गुटखा तस्करांचे जाळे पसरले असून प्रशासनाला याबाबत सर्व काही माहिती असून देखील कोणीच यांच्याकडे लक्ष देत नाही. तालुक्यातील आश्वी भागात त्या मुख्य गुटखा तस्कराने केंद्र बनवले असून रोज आपल्या शॉर्ट बोलेरो गाडीत बसून संगमनेर शहरात वसुलीसाठी येत असल्याची माहिती मिळाली आहे.
“त्या’तस्कराची चलती
कुंभार आळ्यावरील एका वाळू तस्करही आता गुटखा तस्करीत उतरल्याने याठिकाणी दिवसभर ग्रामीण भागातील काही व्यावसायिक गुटखा खरेदीसाठी येत असतात. विशेष म्हणजे त्या तस्कराचे आणि प्रशासनातील काही लोकांचे हितसंबंध असून त्याला जाणूनबुजून पाठीशी घालण्याचे काम काही लोक करत आहेत. निमगाव जाळी येथील “तो’ तस्कर मात्र पडद्याआडून सगळे काम करत असल्याची चर्चा आहे.