पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीत राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर कार्यरत असणाऱ्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या कार्यपध्दतीविषयी प्रचंड तक्रारी आहेत. यामुळे, शिंदे यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
याबाबत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्रालयाला पत्र पाठविण्यात आले असल्याचे, तापकीर यांनी सांगितले आहे. शिक्षण विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे चालू शैक्षणिक वर्षात मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यापासून वंचित रहावे लागले आहे. शिक्षण समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने काम सुरु आहे. प्रशासन अधिकारी शिंदे यांना शिक्षणाधिकारी म्हणून बढती देताना कोणते निकष लावले होते. यापूर्वी, त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून कोणत्या ठिकाणी काम केले होते, याची सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी तापकीर यांनी निवेदनात केली आहे.