शिक्रापूर – येथील काही ठिकाणी ओढे, नाल्यामधील नैसर्गिक स्त्रोत बुजविले आहेत. नैसर्गिक ओढे, नाल्यांची लचकेतोड केली जात आहे.
शिक्रापूर येथील पुणे- नगर रस्त्याकडेला बजरंगवाडी येथे जुन्या काळापासून मोठा ओढा आहे. ओढ्याकडेला काही अंतरावर स्थानिकांनी अतिक्रमण करून जमीन तयार केली होती. ओढ्याच्या स्त्रोतामध्ये स्थानिकांनी मोठ्या आकाराचे पाईप टाकून स्त्रोत कमी केले आहे. त्यामुळे नैसर्गिक स्त्रोत कमी झाला आहे. सध्या जमिनीला सोन्याचा भाव आहे. त्यामुळे ओढे, नाले, नदी पात्राचे लचके तोडून अतिक्रमण करून जमिनीचे क्षेत्र वाढवित आहेत. तलाठी अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत स्थानिक नागरिकांनी तहसीलदार कार्यालय शिरूर येथे तक्रार करणे गरजेचे आहे. स्थानिकांच्या तक्रारी आल्यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या आदेशानुसार कारवाई करता येईल, असे जाधव यांनी सांगितले.