‘इलेक्‍शन’ अन्‌ ‘सिलेक्‍शन’ची धामधूम

महाविद्यालयांच्या निवडणुका व विद्यापीठातील पदांच्या नियुक्‍ती प्रक्रिया चर्चेत राहणार

पुणे – विद्यार्थी निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. महाविद्यालयांत आता “इलेक्‍शन’चे वारे घुमू लागले आहेत. याउलट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक (परीक्षा नियंत्रक), चार विद्याशाखा अधिष्ठातापदांच्या नियुक्‍तीची प्रक्रिया होत आहे. त्यामुळे विद्यापीठात “सिलेक्‍शन’चे चित्र पाहावयास मिळत आहे. परिणामी, महाविद्यालय व विद्यापीठ अनुक्रमे निवडणुका व नियुक्‍ती प्रक्रियेवरून चर्चेत राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. ते उद्या (दि.22) परीक्षा विभागाच्या पदभारातून मुक्‍त होत आहेत. त्यातच विद्यापीठ प्रशासनाने मूल्यामापन व परीक्षा मंडळाच्या नव्या संचालकांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

त्यानुसार अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच परीक्षा विभागाला नवे अधिकारी प्राप्त होतील. त्यासाठी कोणाची “वर्णी’ लागेल, याविषयी बरीच गुप्तता पाळण्यात येत आहे. मुळात परीक्षा विभाग हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यात एका चुकीचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यात चुकांची सर्वस्वी जबाबदारी परीक्षा विभाग प्रमुखांवर येते. त्यामुळे कोणतेही हितसंबंध न जपता पुणे विद्यापीठाची माहिती असणाऱ्या व्यक्‍तींकडे परीक्षा विभागाची सूत्रे सोपवावीत, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थी संघटनांकडून मोर्चेबांधणी
तब्बल 25 वर्षांनी महाविद्यालयांत विद्यार्थी निवडणुका खुल्या पद्धतीने होत आहे. तत्कालिन विद्यार्थी निवडणुकांवरून झालेल्या खून, हाणामारी, वाद-विवादाचा विचार करून आताच्या निवडणुकांमध्ये बऱ्याच प्रमाणात कठोर नियम तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे शांततेत निवडणुका होतील, असा सूर प्राचार्यांतून उमटत आहेत. त्यादृष्टीने महाविद्यालय प्रशासनची तयारी आहे. या निवडणुकांसाठी विद्यार्थी संघटनांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर महाविद्यालयांतील चित्र कसे असेल, हे आताच सांगणे कठीण आहे. तथापि, विद्यार्थी निवडणुकांमुळे सध्या महाविद्यालयांत निवडणुकांचे “फीवर’ आले आहे, हे वास्तव आहे.

अधिष्ठातापदांसाठी “फिल्डिंग’
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार आता विद्यापीठात चार पूर्णवेळ विद्याशाखा अधिष्ठाताही पदे भरण्यात येत आहेत. पुणे विद्यापीठातही अधिष्ठातांच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. विद्यापीठ प्रशासनाने चार दिवसांपूर्वी अधिष्ठातापदांसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानंतर अधिष्ठातापदांसाठी काही उमेदवारांनी वरच्या पातळीवरून “फिल्डिंग’ लावण्यास सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, नियुक्‍तीच्या प्रक्रियेत कुलगुरूंपेक्षा काही व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचा जास्त बोलबाला आहे, असे गृहीत धरून काही उमेदवारांनी त्यादृष्टीने प्रयत्न करीत असल्याची चर्चा रंगली आहे.

चारही विद्याशाखा अधिष्ठातापदांसाठी काही उमेदवारांचा बायोडाटा “स्ट्रॉंग’ आहे. तसेच काही संस्थाचालकांनी आपल्या प्रतिनिधींची निवड होण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू केल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)