महिला सुरक्षेसाठी व्हायरल होत असलेला नंबर अस्तित्वातच नाही

हैद्राबाद येथील दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर चुकीच्या मॅसेज पाऊस

पिंपरी – हैदराबाद येथे एका डॉक्‍टर महिलेवरील बलात्कार आणि क्रूर हत्येनंतर देशभरात संतापाची लाट आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत चर्चा, उपाययोजना, उपक्रम सोशल मीडियावर फिरत आहेत. परंतु काही मॅसेज हे खातरजमा न करताच फॉरवर्ड केल्याने व्हायरल होत असलेले चुकीचे मॅसेज असल्याचे दिसून येत आहे. महिलांना रात्री रिक्षा किंवा टॅक्‍सीने प्रवास करावा लागल्यास त्यांनी संबंधित वाहनाचा नंबर मॅसेजद्वारे 9969777888 या क्रमांकार पाठवावा. त्यानंतर पोलीस संबंधित वाहनावर “जीपीआरएस’द्वारे लक्ष ठेवतील, असा मेसेज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र दैनिक प्रभातच्या टीमने केलेल्या पाहणीत हा नबंरच अस्तित्वातच नसल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियावर अनेक प्रकारची माहिती नागरिकांचा मिळत असते. या माहितीचा उपयोग आपल्याप्रमाणे इतरांनाही व्हावा, अशी अनेकांची प्रामाणिक इच्छा असते. मात्र अशी माहिती पुढे पाठविताना कोणत्याही प्रकारची खातरजमा केली जात नाही. यामुळे अनेकदा नकळत चुकीची माहिती व्हायरल होत राहते. विशेष म्हणजे अनेकदा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव किंवा पोलिसांची अधिकृत माहिती असल्याचे मेसेजमधून भासविले जाते.

“महिलांना रात्री रिक्षा किंवा टॅक्‍सीने एकट्याने प्रवास करावा लगाल्यास संबंधित रिक्षा किंवा टॅक्‍सीचा नंबर 9969777888 या मोबाइल नंबरवर एसएमएस करा. आपल्या मोबाइलवर एक मेसेज येईल. एक्‍नॉलेजमेंटचा आणि आपल्या मोबाइलद्वारे त्या वाहनावर “जीपीआरएस’द्वारे नजर ठेवली जाईल. हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करून जनजागृती करा – महाराष्ट्र पोलीस” असा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक महिलांनी हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला आहे. काही महिलांनी प्रवासादरम्यान याचा उपयोग देखील केला आहे. मात्र दै. प्रभातच्या टीमने या नंबरची खातरजमा केली असता हा नंबरच अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे.

पोलीस मदतीसाठी सतर्क
महिलांच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सतर्क असून महिलांना कोणत्याही प्रकारची तातडीची मदत हवी असल्यास पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांनी केले आहे. दैनिक “प्रभात’शी बोलताना त्यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी 100 किंवा 020-27352500, 020-27352600 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच महिलांसाठी 1090 हा हेल्पलाइनचा क्रमांक आहे. ज्येष्ठ नागरिक 1091 या क्रमांकावर मदतीसाठी फोन करू शकतात.

“सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या 9969777888 या क्रमांकावर मी स्वतः फोन करून पाहिला आहे. मात्र तो नंबर बंद असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. यामुळे महिलांनी तातडीच्या वेळी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा. व्हायरल होत असलेल्या नंबरवर विसंबून राहू नये. आपल्या सुरक्षिततेसाठी महिलांनी रात्रीच्यावेळी प्रवास करताना संबंधित वाहनांचा क्रमांक आपल्या घरच्यांना एसएमएस करून पाठवावा.”
– नीता परदेशी, संस्थापक अध्यक्ष-वुमेन हेल्पलाइन

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.