अटल पेन्शन योजनेला प्रतिसाद कामगारांची संख्या 2 कोटींवर

पुणे – नोव्हेंबर महिन्यात असंघटित क्षेत्रातील तब्बल 9 लाख कामगारांनी अटल पेन्शन योजनेसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी नोंदणी केलेल्या कामगारांची संख्या आता 2 कोटींवर गेली आहे.

वार्धक्‍य आल्यावर या कामगारांना पेन्शन सारखी सुविधा मिळावी याकरिता ही योजना सुरू केली आहे. संघटित क्षेत्रातील 18 ते 40 वयोगटांतील कर्मचाऱ्यांना या योजनेत सहभागी होता येते. सहभागी होऊन या कामगारांनी आपले योगदान दिल्यानंतर या कामगारांना 60 वर्षांनंतर मासिक 1 ते 5 हजार रुपये मिळण्याची हे योजना आहे.

या योजनेचे नियंत्रण पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण करते. मार्च 2020 पर्यंत या योजनेत सहभागी झालेल्या कामगारांची संख्या 2.25 कोटींपर्यंत जाईल, असे या संस्थेने म्हटले आहे. असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय चांगली योजना आहे. यासंदर्भात वातावरण निर्मिती झाल्यामुळे कामगारांची संख्या वाढत आहे. यात कामगारांचे तीन फायदे आहेत. 60 वर्षांनंतर कामगाराला निश्‍चितपणे निवृत्ती वेतन मिळते. कामगाराच्या मृत्यूनंतर पत्नीला तेवढीच रक्‍कम पेन्शन म्हणून मिळते. त्याचबरोबर दोघांचा मृत्यू झाल्यानंतर पाल्याला कामगाराने जेवढी रक्‍कम जमा केली असेल तेवढी रक्‍कम परत मिळते.

सरकारी बॅंकांत अधिक खाती
या योजनेत 1 कोटी कामगार सहभागी होण्यास सुरुवातीला 3 वर्षे लागली. मात्र, नंतर केवळ दीड वर्षांत पुढील 1 कोटी कामगार या योजनेत सहभागी झाले. त्यामुळे आगामी काळात या योजनेत सहभागी होणाऱ्या कामगारांची संख्या वेगाने वाढण्याची शक्‍यता आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत यावर्षी या योजनेत 46 लाख सदस्य झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 30 टक्‍के वाढ झाली. यातील 36 लाख खाती सरकारी बॅंकांमध्ये उघडण्यात आली आहेत. 7 लाख खाती विभागीय ग्रामीण बॅंका आणि 3 लाख खाती खासगी आणि पेमेंट बॅंकांमध्ये उघडण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.