पॅरिस: करोनाने जगभरात घेतलेल्या बळींनी शुक्रवारी 5 हजार हा आकडा ओलांडला. जगातील 133 देशांमध्ये करोना फैलावला आहे. त्या विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात 5 हजार 116 जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये चीनमधील मृतांची संख्या सर्वांधिक 3 हजार 177 इतकी नोंदली गेली आहे. त्याखालोखाल इटलीत 1 हजार 16 जण तर इराणमध्ये 514 जण मृत्युमुखी पडले.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात चीनमध्ये सर्वप्रथम करोनाचा संसर्ग आढळला. त्या विषाणूची बाधा जगभरात 1 लाख 39 हजारहून अधिक नागरिकांना झाली आहे. करोनाच्या आजाराला कोविड-19 असे नाव देण्यात आले आहे. त्याच्या जगभरातील फैलावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे करोनाशी दोन हात करण्यासाठी संपूर्ण जग सरसावल्याचे चित्र आहे.