नाल्यात आढळले आणखी चार मृतदेह
नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या दंगलीच्या सुमारे एक आठवड्यानंतर याठिकाणच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. परंतु, अजूनही परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दंगलीतील मृतांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सोमवारी दिल्लीतील दंगलीतील मृतांची संख्या 46 पर्यंत पोहोचली आहे.
Delhi: Death toll rises to 46 now; (38 at Guru Teg Bahadur Hospital, 3 at Lok Nayak Hospital, 1 at Jag Parvesh Chander Hospital & 4 at Dr. Ram Manohar Lohia Hospital) in North East Delhi violence. pic.twitter.com/XWvboAduLM
— ANI (@ANI) March 2, 2020
दरम्यान, रविवारी गोकलपुरी आणि शिव विहार परिसरातील नाल्यात आणखी चार मृतदेह आढळून आले. परंतु, पोलिसांनी या मृतदेहांचा दंगलीशी काही संबंध आहे की नाही हे अजून स्पष्ट झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
ईशान्य दिल्लीतील काही भागांमध्ये लोकांना रोख रकमेच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. दंगलीनंतर बॅंक आणि एटीएम बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आतापर्यंत 254 तक्रारी आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी 903 लोकांना अटक करण्यात आली आहे.
शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत 41 गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत ईशान्य दिल्लीमध्ये कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन, त्यांनी केले आहे.
पोलिसांनी सांगितले की, गोकुळपुरी परिसरातील नाल्यात रविवारी दोन मृतदेह आणि शिवविहार येथील नाल्यात दोन मृतदेह सापडले. उल्लेखनीय म्हणजे बुधवारपासून आतापर्यंत गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित यांच्याह अनेक दंगल पीडितांचे मृतदेह नाल्यात सापडले आहेत.