ओतूर – नगर-कल्याण माहामार्गालगत असलेल्या पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) या गावाच्या हद्दीतील नवलेवाडी परिसरात एकास करोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य विभाग व जुन्नर तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे, त्यामुळे जुन्नर तालुक्यातील रुग्णाची एकूण संख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. संबंधित बाधित रुग्ण हा काही दिवसांपूर्वीच मुंबईहून गावी पिंपरी पेंढारच्या नवलेवाडी येथे आला होता. येथे आल्यानंतर तो गावातील अनेकांच्या संपर्कात आला असल्याने येथील नागरिकांची चिंता वाढली आहे.
दरम्यान परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार हणमंत कोळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी उमेश गोडे, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, मंडल अधिकारी राजेश ठुबे, कामगार तलाठी संजय गारकर, सरपंच सविता वाघ यांनी खबरदारीचा उपाय म्हणून एक बैठक घेतली होती.
यावेळी करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास कोणत्या प्रकारचे नियम व कायदे पाळावयाचे याची माहिती देऊन प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या आहेत. याचवेळी नवलेवाडीचा संपूर्ण भाग हा कंटेन्मेंन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र आळेचे वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश पाटील, पिंपरी पेंढार आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आरती गीते यांनी आपल्या संपूर्ण स्टाफसह दखल घेत पॉझिटिव्ह रुग्ण व रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना पुढील तपासणीसाठी लेण्याद्री येथील कोव्हीड-19 केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.