पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवडही शहरं गेल्या काही वर्षांत आयटी (IT) आणि औद्योगिक नगरी म्हणून उदयास आली आहेत. मोठ्या प्रमाणात झालेलं शहरीकरण आणि स्थलांतरितांची संख्या यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड वाढत आहे. यासोबतच सर्वाधिक दुचाकींची संख्या असलेलं शहर म्हणूनही पुण्याची ख्याती आहे.
मात्र, गेल्या वर्षापासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहन खरेदी करण्याचं प्रमाण घटलं आहे. गेल्यावर्षी सरासरीच्या तुलनेत 37 टक्के वाहनांची विक्री कमी झाली आहे. यामागे कोरोना आणि सातत्याने वाढत जाणारे इंधनाचे दर ही कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.
2019-20 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21 मध्ये वाहनांच्या नोंदींची संख्या घटली आहे. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा 37 टक्के वाहनांच्या नोंदी कमी झाल्या आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. तर तीन चाकी, ट्रक, बस यांसारख्या व्यावसायिक वाहनांच्या नोंदीही कमी झाल्या आहेत.
एकीकडे वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे आणि कोरोनाच्या कारणामुळे वाहनांच्या विक्रीची संख्या घटली असली तरी दुसरीकडे इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे नागरिकांचा ओढा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. ई स्कूटरसारख्या इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. एका वर्षात ई-स्कूटरची संख्या तब्बल 45 टक्क्यांनी वाढली आहे.
डिझेलवरची 5 हजार 767 वाहनं आहेत. तर पेट्रोल वाहनांची संख्या ही 3 लाख 4 हजार 882 वर गेली आहे. त्यापाठोपाठ सीएनजी आणि एलपीजीसारख्या प्रदूषणविरहित इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. शहरात आतापर्यंत 42 हजार 215 सीएनजी आणि एलपीजी वाहनांच्या नोंदी झाल्या आहेत. यामध्ये नऊ हजार 715 चारचाकी आणि दोन हजार 148 तीनचाकी वाहनाचा समावेश आहे. यापैकी 11 हजार 903 वाहनं गेल्यावर्षी वाढली आहेत.
पुणे आरटीओकडे असणाऱ्या नोंदीप्रमाणे 15 वर्षांवरच्या जुन्या खासगी वाहनांचीो संख्या 2 लाख 60 हजारांच्या जवळ आहे. तर 10 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वाहनांची संख्या 40 हजारांच्या घरात आहे. ही वाहनं स्क्रॅपेज पॉलिसीनुसार भंगारात जाऊ शकतात. वाहन भंगारात दिल्यानंतर वाहनधारकांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. त्याचा फायदा त्यांना नवीन वाहन घेताना होणार आहे. या प्रमाणपत्रामुळे नवीन वाहनाच्या किमतीत 15 ते 25 टक्के सवलत मिळू शकणार आहे.