पर्यटननगरी ‘हाऊस फुल्ल’! ,लोणावळ्यात पर्यटकांची संख्या वाढली

लोणावळा – एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाही दुसरीकडे पर्यटन नगरी लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या “विकेंड’ला लोणावळा शहरातील सर्व हॉटेल्स, खासगी बंगले, पर्यटन स्थळे आणि रस्ते पर्यटकांनी फुलले होते.

सध्या सुरू असलेल्या मुलांच्या शालेय सुट्ट्या आता संपण्याच्या टप्प्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलांसह आपल्या कुटुंबाला घेऊन या सुट्ट्यांच्या आनंद लुटण्यासाठी सर्वजण बाहेर पडत आहे. तसेच मागील संपूर्ण महिना हा लोकसभेच्या निवडणूक धामधुमीत गेला. या धामधुमीतून आता सर्वच जण बाहेर पडले असून, आपल्या कुटुंबासोबत निवांत क्षण घालविण्यासाठी पर्यटनाचा मार्ग निवडत आहे. मात्र बाहेर पडलेल्या रणरणत्या उन्हामुळे कोणत्याही गर्मीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा लोणावळा-खंडाळा, माथेरान, महाबळेश्‍वर, पन्हाळा यासारख्या थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटक अधिक पसंती देत आहेत.

लोणावळा-खंडाळा हे पर्यटन स्थळ मुंबई आणि पुणे या दोन महानगराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तसेच नॅशनल हायवे आणि “एक्‍सप्रेस वे’ ने हे शहर दोन्ही महानगरांना जोडले गेले असल्याने केवळ काही तासांत या ठिकाणी पोचता येते. त्यामुळे पर्यटकांची पहिली पसंती लोणावळ्याला नेहमीच मिळत राहिली आहे.

या शनिवार आणि रविवारी देखील पर्यटकांची मोठी गर्दी लोणावळा शहरात झाली होती. येथील लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, अमृतांजन पॉईंट, राजमाची पॉईंट यासारख्या पर्यटन पॉईंट सोबतच शहरातील चिक्‍कीची दुकान, हॉटेल्स पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेली होती. याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवरही झाला होता. खंडाळा बोर घाटात वाहतूक धीम्या गतीने सुरू होती, तर लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर देखील वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.