पर्यटकांच्या संख्येत 40 टक्‍क्‍यांनी वाढ

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रयत्नांना यश : दर्जेदार सुविधा देण्यावर भर

पुणे – पर्यटकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना अपेक्षेपेक्षाही अधिक यश आले आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षांच्या कालावधीत पर्यटकांचा टक्का तब्बल चाळीस टक्‍क्‍यांनी वाढला आहे. त्यातूनच महामंडळाच्या महसुलातही वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत.

निसर्गरम्य वातावरण आणि नयनरम्य परिसर ही महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रांची ख्याती आहे. त्यामुळेच या पर्यटनस्थळांकडे केवळ राज्यातीलच नव्हे तर देश विदेशातील पर्यटक आकर्षित झाले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांच्या कालावधीत या पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी राज्य शासनाला साफ अपयश आले होते. या पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळत नसल्याने राज्य शासनाला पर्यटकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत होते. विशेष म्हणजे खाजगी हॉटेल चालक या गैरसोयींचा फायदा घेत होते. हे खासगी हॉटेल चालक, राज्यातून अथवा परराज्यांतून येत असलेल्या भाविकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारत होते. त्यामुळे या पर्यटकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.

त्यामुळे राज्य शासनाने पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटकांना सवलतीच्या दरात सुविधा पुरवावी, अशी मागणी पर्यटकांच्या माध्यमातून करण्यात येत होती. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून या पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच पर्यटकांच्या संख्येमध्ये अपेक्षेपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन या सुविधा आणखी सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक हरणे यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.