कराड तालुक्‍यातील करोनामुक्‍तीचा आकडा 5 हजारांवर

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या प्रयत्नाला यश; उपचारार्थ फक्‍त 1700 करोनाबाधित रूग्ण

पराग शेणोलकर
कराड – सातारा जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्‍याची वाटचाल करोना मुक्‍तीकडे आहे. गेल्या महिन्याभरात तालुक्‍यातून करोनामुक्‍त झालेल्या रूग्णांचा आकडा दिलासादायक असून यात वाढ होत आहे. सध्या करोनामुक्‍त होणाऱ्यांची संख्या 5 हजारापार गेली आहे. फक्‍त 1700 रूग्ण करोनावर उपचार घेत आहेत. हे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह जिल्हा व तालुका प्रशासनाचे यशच म्हणावे लागेल.

जनता कर्फ्यू त्यानंतर मार्चपासूनचा लॉकडाऊन आणि त्यानंतर लॉकडाऊनमध्ये शासनाने दिलेली शिथिलता या दरम्यानच्या काळात करोनाचा संसर्ग प्रचंड वाढल्याचे समोर आले. यासाठी जिल्ह्यातील निष्काळजी असणारे नागरीक जेवढे जबाबदार आहेत.तेवढ्याच प्रशासनाच्या कामातील त्रुटी कारणीभूत असल्याचा सूर आवळला जात आहे.

कराड तालुक्‍यातील बाधितांची वाढती संख्या काळजीचा विषय बनला. जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांच्या तुलनेत कित्येक पटीने कराड तालुक्‍यात करोना पसरला. बघता बघता बाधितांचा आकडा काही हजारात जाऊन पोहोचला. या करोनाच्या संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे.

मुख्याधिकारी रमाकांत डाके, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख यांच्यासह पोलीस, डॉक्‍टर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, नगरपालिकेचे कर्मचारी, तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनांनी करोनाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू ठेवले.
या प्रयत्नाला यश आल्याचे गेल्या महिनाभरातील करोनामुक्‍तीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

तालुक्‍यातील करोनामुक्‍ती 74 टक्‍क्‍यांपार गेली आहे. आजअखेर कराड तालुक्‍यात सुमारे 7 हजार 200 हून अधिक करोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सुमारे 5 हजार 300 हून अधिक रूग्ण करोनामुक्‍त झाले आहेत. हे वृत्त दिलासादायकच आहे. यासाठी परिश्रम घेणारे जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासन तसेच यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे कराडचे नागरिक यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. ही वाटचाल अशाच पद्धतीने राहिल्यास येत्या काळात कराड तालुका करोनामुक्‍त झाल्याचे चित्र पहावयास मिळेल.

दरम्यानच्या काळात कराड तालुक्‍यातील करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. हे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीच्या बैठका घेऊन कराडमधील वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा केली. येथील कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्रि, उपजिल्हा रूग्णालय, कराड हॉस्पिटल, सिध्दीविनायक, श्री हॉस्पिटलसह नव्याने जैन समाजाचे कोविड सेंटर, मुस्लिम समाजाने पुढाकार घेत सुरू केलेले वारणा कोविड सेंटर याशिवाय पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रि कारखाना कार्यस्थळावरील कोविड सेंटर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या पुढाकाराने टिळक हायस्कूलमधील कोविड सेंटर आणि दि. 25 रोजी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुरू होणारे कोविड सेंटर अशा पद्धतीने सुमारे 1400 हून अधिक बेडची व्यवस्था जिल्हाधिकारी सिंह यांनी तातडीने केली.

याकामी येथील वैद्यकीय सुविधा तसेच लागणारा स्टाफ, ऑक्‍सिजन बेडसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी योग्य ते नियोजन केले. याचा फायदा कराड तालुक्‍याला झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. तालुक्‍यातून बाधितांच्या दुपटीने करोनामुक्‍त होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. ही कराडकरांसाठी दिलासादायक बाब आहे. भविष्यात काळजी घेतल्यास कराड तालुका करोनामुक्‍त होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.