देशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

नवी दिल्ली – भारतात गेल्या नऊ दिवसांपासून नवीन रूग्णसंख्येपेक्षा बऱ्या झालेल्या रूग्णांची संख्या वाढते आहे.बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ होत आहे. एका दिवसात बरे झालेल्या रूग्णांची सरासरी संख्या 90 हजारापेक्षा जास्त आहे. 

देशात गेल्या 24 तासात 92 हजारापेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. यातील 76 टक्के रुग्ण 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बरे झाले. तर नव्या सक्रीय रूग्णांची संख्या 88,600 इतकी आहे. यासोबत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 50 लाख इतकी आहे.

रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर सततची वाढ कायम राखत 82 टक्‍क्‍यांइतका आहे. रुग्ण बरे होण्याच्या ह्या प्रमाणामुळे भारत रुग्ण बरे होण्याच्या जागतिक क्रमवारीत सतत आघाडीवर आहे.

महाराष्ट्रातून 23 हजार जण बरे झाले तर आंध्रप्रदेश मधून 9 हजारापेक्षा जास्त जण बरे झाले. गेल्या चोवीस तासात 1,124 मृत्यूची नोंद झाली आहे. नवीन नोंद झालेल्या मृत्यूपैकी महाराष्ट्रात 430 मृत्यू मृत्यू नोंदवले आहे तर कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये अनुक्रमे 86 आणि 85 मृत्यूंची नोंद झाली आहे.

नवीन रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याचा दर जास्त असल्याने सक्रिय रूग्ण आणि बरे झालेले रूग्ण यातील फरक जवळपास 40 लाख इतका आहे. सक्रीय रूग्णांची संख्या सतत कित्येक दिवसांपासून 10 लाखांपेक्षा कमी आहे. सक्रीय पॉझिटीव्ह रूग्णांचे प्रमाण 15 टक्के इतके असून ते सतत कमी होत आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.