“कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांची संख्या घटली

शिक्षण क्षेत्रातून चिंता व्यक्‍त

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “कमवा व शिका’ योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मानधन वितरणात गैरव्यवहार झाल्याची घटना यापूर्वी घडली. त्यानंतर आता या योजनेंतर्गत यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 1 हजार 200 एवढ्या संख्येने गतवर्षीच्या तुलनेत म्हणजेच निम्म्याने घटली असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. त्यावरून शिक्षण क्षेत्रातून चिंता व्यक्‍त होत आहे.

पुणे विद्यापीठाची “कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति तास 45 रुपये प्रमाणे चार तास काम केल्यानंतर मानधन दिले जाते. त्यातून विद्यार्थ्यांचा महिन्याचा खर्च भागतो. त्यासाठी विद्यार्थी या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील असतात. आता विद्यार्थी संख्या निम्म्याने घटल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गतवर्षी या योजनेंतर्गत 2 हजार 267 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यावर्षी आतापर्यंत 641 विद्यार्थी प्रवेश घेतले असून, अजूनही प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. ही संख्या जवळपास 1 हजारांच्या आसपास जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचा विचार करता यावर्षी सुमारे बाराशे विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. कोणत्या कारणावरून ही संख्या घटली आहे, हा प्रश्‍न निर्माण होत आहे.

यंदाच्या वर्षापासून या योजनेत सहभागी होण्यासाठी विभागप्रमुखांचे शिफारसपत्र आणि वर्गातील 75 टक्‍के उपस्थिती असणे बंधनकारक केले आहे. या दोन्ही नियमाची प्रभावीपणे अंमलबजाणी करण्यात येत आहे. त्यामुळे ही संख्या विद्यार्थी घटली असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असेही म्हटले जात आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होण्यास कोणतीही आडकाठी भूमिका घेतली जात नसून इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असल्याचे विद्यापीठाच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.