मुंबई – गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. आयटी कंपन्यांनी नोकर भरतीचे प्रमाण कमी केल्यामुळे यापुढील काळात अभियांत्रिकी शिक्षणाकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा ओढा आणखी कमी होईल, असे या क्षेत्रातील एक तज्ज्ञ नीती शर्मा यांनी म्हटले आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बीटेक साठीची विद्यार्थ्यांची नोंदणी २०१६-१७ मध्ये अंदाजे ४० लाख इतकी होती ती २०२०-२१ मध्ये ३६ लाखांपर्यंत घसरली आहे.
त्या म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षांत, बीटेक आणि बीई अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या सातत्याने कमी झाली आहे. याचे मुख्य कारण मुख्य प्रवाहातील नोकऱ्यांच्या संधी कमी झाल्या आहेत. आयटी कंपन्यांद्वारे एकूण नवीन नोकरभरतीचे प्रमाण २०२२ आर्थिक वर्षातील एकूण पासआउटच्या २६ टक्क्यांवरून २०२३च्या आर्थिक वर्षात १५ टक्के आणि नंतर २०२४च्या आर्थिक वर्षात १० टक्क्यांवर घसरले आहे. तथापि, अजूनही क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबरसुरक्षा यासारख्या अभ्यासक्रमांना विशेष मागणी आहे.
सध्याचे कर्मचारी, फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवार या दोघांनीही आयटी क्षेत्रात स्पर्धात्मक राहण्यासाठी या विशिष्ट क्षेत्रातील कौशल्य वाढवण्याची गरज ओळखली आहे असे त्या म्हणाल्या. कॅम्पस प्लेसमेंटच्या परिस्थितीनुसार २ लाख लोकांना नोकरी न मिळण्याचा धोका असू शकतो. त्यात आयटी क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांच्या नोकऱ्या घटण्याचे प्रमाण अधिक आहे.
२०२२-२३ मध्ये, मागच्या वर्षाच्या तुलनेत नवीन नोकरभरतीत ९ टक्क्यांनी घट झाली होती आणि आर्थिक वर्ष २४ मध्ये आणखी ५ टक्क्यांनी घट होण्याची अपेक्षा आहे. एकूणच, नोकरभरती ४० टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. अलीकडील अहवालानुसार मागील वर्षाच्या तुलनेत, एकूण नवीन नोकर भरतीत सुमारे ४० ते ५० टक्के घट अपेक्षित आहे असे त्या म्हणाल्या.