मुंबई – चलनातील दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या वेगाने कमी होत आहे. सध्या भारतामध्ये एकूण चलनामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या केवळ 214 कोटी इतकी आहे. एकूण नोटांमध्ये दोन हजाराच्या नोटांचे प्रमाण आता केवळ 1.6 टक्के इतके असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सध्या सर्व मूल्याच्या चलनी नोटांची संख्या 13,053 कोटी इतकी आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये नोटांची संख्या 12,437 कोटी इतकी होती. त्याचा अर्थ एकूण नोटाच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र दोन हजार रुपयाच्या नोटांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये चलनात दोन हजार रुपयाच्या 274 कोटी नोटा होत्या.
एकीकडे दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या कमी होत असतानाच 500 रुपयांच्या नोटांची संख्या मात्र वेगाने वाढत आहे. सध्या चलनामध्ये पाचशे रुपयाच्या 4,554 कोटी इतक्या नोटा आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये चलनात पाचशे रुपयाच्या 3,867 कोटी नोटा होत्या.
पूर्ण नोटांमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 35 टक्के इतके आहे. भारतामध्ये गेल्या वर्षी 28.27 लाख कोटी रुपये मूल्याच्या विविध नोटा कार्यरत होत्या. आता ते प्रमाण वाढून 31 लाख कोटी रुपये इतके झाले आहे.
नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारने चलनातून त्यावेळी मोठ्या मूल्याच्या नोटा काढून घेतल्या होत्या. त्याचबरोबर नव्या दोन हजार आणि पाचशे रुपये मूल्याच्या नोटा जारी केल्या होत्या. कालांतराने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई कमी करण्यात येत असून आता ही छपाई पूर्णपणे बंद झाली असल्याचे समजले जाते. चलनातील काळा पैसा कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने नोटाबंदी जाहीर केली होती. मात्र त्यामुळे जास्त काळा पैसा बाहेर आला नाही असे समजले जात आहे.