नगरमधील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी मिळेनात बेड; रुग्णांच्या नातेवाईकांची हृदयद्रावक धावपळ
नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येची वाटचाल आता दहा हजाराकडे सुरु झाली आहे. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही चांगले आहे. तथापि, उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्याही प्रचंड वेगाने वाढत असल्याने नवीन रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यास नगरमधील बहुतेक कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे पॉझटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची उपचार मिळविण्यासाठी ह्दयद्रावक धावपळ सर्वांनाच उघड्या डोळ्यांनी पहावी लागत आहे.
कालपर्यंत जवळपास शंभरापेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण दगावले. दुर्देवाने त्यांच्यावर अंत्यविधी करण्यासाठी देखील नगरच्या अमरधाममधील यंत्रणा तोकडी पडत आहे. करोनाबाधित मयतांवर नालेगाव अमरधामधील विद्युतधाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मात्र, तेथेही 24 तासांत केवळ दहाच अंत्यसंस्कार करण्याची क्षमता त्या दाहिनीची असल्याने अनेक मयतांवर अंत्यसस्कारासाठी देखील वाट पहावी लागत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येनेही सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज दुपारपर्यंत 384 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. काल सायंकाळी सहा वाजेपासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत नव्या 483 रुग्णांची भर पडली. आजअखेर नगर जिल्ह्यात 6 हजार 250 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची ही टक्केवारी 64.25 टक्के इतकी असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांनी दिली. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 367 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये आज संध्याकाळपर्यंत 483 रुग्ण करोनाबाधित आढळून आले. बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर महापालिका, संगमनेर, राहाता, नगर ग्रामीण, छावणी परिषद, नेवासा, शेवगाव, कोपरगांव आदी ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे.
नगरमधील करोना अपडेटस्
बरे झालेले एकूण रुग्ण : 6250
उपचार सुरू असलेले रूग्ण : 3367
मृत्यू : 106
एकूण रूग्ण संख्या : 9723
जिल्ह्यातील 384 रुग्णांना डिस्चार्ज..!
आज दिवसभरात जिल्ह्यातील एकूण 384 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये, नगरमधील 172, संगमनेर 23, राहाता 3, पाथर्डी 27, नगर ग्रा.16, श्रीरामपूर18, कॅन्टोन्मेंट 13, नेवासा 21, श्रीगोंदा 18, पारनेर 10, अकोले 4, शेवगाव 14, कोपरगाव 39, जामखेड 5, मिलिटरी हॉस्पीटलमधील एका रुग्णाचा समावेश आहे.