पिंपरीत उपचाराधीन रुग्णसंख्या तीन हजारपेक्षा कमी

  • नवीन 244 रुग्णांची नोंद
  • 339 जणांना डिस्चार्ज

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आज पुन्हा तीनशेच्या खाली आली आहे. तर करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या तीन हजारपेक्षा कमी झाली आहे. आज शहरात 244 जणांना करोनाची लागण झाली. तर 17 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (दि. 10) शहरात 244 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 53 हजार 222 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 17 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 10 व शहराबाहेरील 7 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 6309 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरामध्ये 339 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 46 हजार 179 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4817 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 1645 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 1195 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 2840 इतकी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.