लोणी काळभोर : हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी व फुरसुंगी या चार ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (दि. 26) दिवसभरात करोनाचे तब्बल चौदा रुग्ण आढळून आले. यामध्ये पाच महिला तर नऊ पुरुषांचा समावेश आहे.
हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सोमवार (दि. 22) पासून अवघ्या पाच दिवसांत करोना बाधित रुग्णांची संख्या तब्बल पन्नासच्या घरात जाऊन पोचली आहे. आरोग्य विभागाने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अडीचशेहून अधिक जणांना होम क्वारंटाइन केले आहे. लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरमधून शुक्रवारी (दि. 26) सकाळी 105 जणांचे स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.
थेऊर, कुंजीरवाडी, वळती, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, कदमवाकवस्ती या प्रमुख ग्रामपंचायतींच्या हद्दीत मागील चार दिवसांत करोनाचे तब्बल 34 रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नव्वदहून अधिक जणांचे स्वॅब गुरुवारी (दि. 25) सकाळी पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत पाठवले होते. तपासणी अहवाल शुक्रवारी सायंकाळी मिळाला आहे.
या अहवालानुसार फुरसंगी (2 रुग्ण), कुंजीरवाडी (2 रुग्ण), लोणी काळभोर (2 रुग्ण), मांजरी ब्रुद्रुक (2 रुग्ण), मांजरी खुर्द (1 रुग्ण) असे एकूण नऊ पॉझिटिव्ह आढळून आले. तर थेऊर फाट्यावरील एका हॉटेलमध्ये ये-जा करणाऱ्या चार नामांकित पाहुण्यांच्यासह एक आचारी असे पाच जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तर लोणी काळभोर गावातील एक 48 वर्षीय व्यक्तीही करोना बाधित असल्याचे शुक्रवारी सकाळी उघड झाले.
लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. डी. जे. जाधव म्हणाले, लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरमधून गुरुवारी पाठवलेल्या नव्वदपैकी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर उर्वरीत अहवाल निगेटीव्ह आले आहेत.