भोर (प्रतिनिधी): भोर तालुक्यातील करोना बाधितांच्या संख्येत गेल्या चार दिवसांपासून वाढच होत आहे. मानकरवाडीतील बाधित रुग्णाची पत्नी आणि मुलाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 10वर पोहोचली असल्याची माहिती भोरचे तहसीलदार अजित पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली.
डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे म्हणाले की, तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील रायरी येथील 6 व धारांबेवाडीतील 1 तर वीसगाव खोऱ्यातील मानकरवाडीतील 3 करोनाबाधित रुग्णांचा यात समावेश आहे. तऱ् रायरी, मानकरवाडी, धारांबे व इतर ठिकाणच्या 23 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहेत. त्यातील मानकवाडीतील तिघांचे अहवाल आले असून त्यात दोघे पॉझिटिव्ह तर एक निगेटिव्ह आला आहे. उर्वरीत 20 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. विशेषबाब म्हणजे सध्या करोनाबाधित असलेले दहाही रुग्ण हे मुंबईहून गावी आलेले आहेत. तालुक्यात जवळपास 25 हजारा लोक मुंबईवरून आलेले असले तरी मागील 8 ते 10 दिवसांपूर्वी गावी आलेले लोकच क्वारंटाइन केले असतानाच करोनाबाधित आढळले असल्याने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.
4331 जणांचे विलगीकरण
भोर तालुक्यात घर (होम) आणि शाळांमध्ये विलगीकरण केलेल्यांची संख्या 4304 आहे. तर इंन्स्टीट्युशन विलगीकरण करण्यात आलेल्यांची संख्या 37 असे एकूण 4341 जणांचे विलगिकरण केले आहे. तर तालुक्यात एकूण 11 चेक पोस्ट उभारलेली असून या पुढे बाहेरुन येणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार अजित पाटील व गटविकाविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.