पुणे-लोणावळा मार्गावर 42 वर्षांत केवळ 42 च “ईएमयू’
पुणे – मध्य रेल्वेने सुरू केलेल्या “ईएमयू’ (इलेक्ट्रिकल मल्टीपल युनिट) या सेवेला 3 फेब्रुवारी रोजी 95 वर्षे पूर्ण झाली आहेत. याकाळात मुंबई विभागात 1,500 हून अधिक लोकल (ईएमयू) धावत आहेत. परंतु, पुणे-लोणावळा-पुणे मार्गावर धावणाऱ्या लोकलची संख्या मागील 42 वर्षांत 42 च असल्याची खंत प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
लोणावळा ते पुणे लोकल सेवा 11 मार्च 1978 रोजी सुरू करण्यात आली. वारंवार मागणी करूनदेखील लोकलची संख्या वाढवण्यात येत नाही. या मार्गावर रोज ये-जा करणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आदींची संख्या अधिक असून देखील लोकलच्या फेऱ्यांची संख्या मात्र कमी आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावर दोन मार्ग असूनदेखील लोकलची संख्या कमी असल्याने प्रवाशांना नाहक गर्दीचा सामना करावा लागतो, असे रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या.
“ईएमयू’चा वाढदिवस केक कापून साजरा
3 फेब्रुवारी 1925 साली “ईएमयू’ व्हीटी ते कुर्ला मार्गावर सेवा सुरू केली होती. मुंबईचे तत्कालीन राज्यपाल लेस्ली विल्सन यांनी बॉम्बे व्हीटी (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज स्थानक) येथे हिरवा झेंडा दाखवला होता. “ईएमयू’च्या 95 व्या वाढदिवसानिमित्त सोमवारी गाडीला सजवण्यात आले होते. यासह मुंबई विभागाचे कर्मचारी वीणाधरन पीटी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी अतिरिक्त महाव्यवस्थापक एस. पी. वावरे, प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता ए. के. गुप्ता, मुख्य विद्युत अभियंता अनूप अग्रवाल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पीयूष कक्कर आणि एच. जी. तिवारी यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी तसेच प्रवासी उपस्थित होते.