अमेरिकेतील बाधितांनी ओलांडला 7 लाखांचा टप्पा
20 हजारांहून अधिक मृतांची नोंद होणारा स्पेन तिसरा देश
जवळपास 6 लाख रुग्ण करोनामुक्त ठरल्याने दिलासा
पॅरिस : गभरातील करोनाबळींच्या संख्येने शनिवारी दीड लाखांचा टप्पा पार केला. जगात सर्वांधिक बळींची नोंद अमेरिकेत झाली आहे. त्या देशात 37 हजारांहून अधिक रुग्ण दगावले आहेत. ते प्रमाण जगभरातील मृतांच्या जवळपास एक-चतुर्थांश इतके आहे.
जगभरात हाहाकार उडवणाऱ्या करोना विषाणूचा फैलाव 210 देश आणि प्रदेशांमध्ये झाला आहे. जगभरातील करोनाबाधितांची संख्या 23 लाखांजवळ जाऊन पोहचली आहे. अमेरिकेपाठोपाठ इटलीत 22 हजारांहून अधिक रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. स्पेनमध्येही करोनामुळे मोठी जीवितहानी झाली आहे.
20 हजारांहून अधिक मृतांची नोंद होणारा तो आता तिसरा देश ठरला आहे. करोनाने फ्रान्समध्ये 18 हजारांहून अधिक तर ब्रिटनमध्ये 15 हजारांहून अधिक बळी घेतले आहेत. इराण आणि बेल्जियम या देशांनी मृतांच्या संख्येबाबत 5 हजारांचा टप्पा पार केला आहे. खंडनिहाय विचार करता करोनामुळे युरोपमध्ये सर्वांधिक हानी झाली आहे.
त्या खंडात जगातील निम्मे करोनाबाधित आहेत. त्याशिवाय, युरोपमधील बळींचा आकडा 1 लाखजवळ जाऊन पोहोचला आहे. प्रचंड संकट बनलेल्या करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण जगच लढा देत आहे. अशात जगभरातील जवळपास 6 लाख रुग्ण करोनामुक्त होण्याची बाब मोठाच दिलासा देणारी ठरली आहे.