बीजिंग – चीनच्या मध्य प्रांतात गेल्या महिन्यात आलेल्या पूरामध्ये मरण पावलेल्या व्यक्तींची संख्या आता 302 वर पोहोचली आहे. अद्यापही डझनभर जण बेपत्ता आहेत. गेल्या तीन दिवसात चीनमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
हेनान प्रांताची राजधानी झेंगझाऊ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पूरस्थिती अजूनही कायम आहे. या भागामध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 292 इतकी आहे. तर 47 जण बेपत्ता झाले आहेत. मरण पावणाऱ्यांमध्ये अचानक आलेल्या पूरामुळे भुयारी रेल्वेमध्ये आणि बोगद्यांमध्ये अडकून मरण पावलेल्यांची संख्या लक्षणीय आहे.
17 जुलपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका तब्बल 13 दशलक्ष नागरिकांना बसला आहे. या पावसामुळे 9 हजार घरांचे नुकसान झाले आहे. एकट्या हेनान प्रातात अतिवृष्टीमुळे 53 अब्ज युआ (8.2 अब्ज डॉलर)चे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीबाबत सरकार निष्काळजी आहे, असे वार्तांकन करणाऱ्या विदेशी पत्रकारांना सरकारी रोषाला सामोरे जावे लागते आहे. झेंगझाऊमध्ये पावसात अडकलेल्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला हे शुटिंग डीलीट करण्यास भाग पाडले गेले आहे. तर बीबीसी म्हणजे फेक न्यूज ब्रॉडकास्टिंग कंपनी असल्याची संभावना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केली आहे.