भारतातील करोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 20 हजारांचा टप्पा

सुमारे 4 हजार रूग्ण करोनामुक्त; बरे होण्याचे प्रमाण जवळपास 20 टक्के
नवी दिल्ली : भारतातील करोनाबाधितांच्या संख्येने बुधवारी 20 हजारांचा टप्पा ओलांडला. नव्या बाधितांमध्ये दिवसागणिक पडणारी भर चिंताजनक असली तरी देशातील सुमारे 4 हजार रूग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. करोना संकटात रूग्ण बरे होण्याचे जवळपास 20 टक्के प्रमाण दिलासादायक ठरत आहे.

संपूर्ण जगाप्रमाणेच भारतालाही करोना फैलाव रोखण्यासाठी व्यापक लढा द्यावा लागत आहे. देशात करोनाने आतापर्यंत 650 हून अधिक रूग्णांचा बळी घेतला आहे. देशात सर्वांधिक करोनाबाधितांची आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. त्याखालोखाल गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमधील बाधितांची संख्या 2 हजार 300 जवळ पोहचली आहे. त्या राज्यात करोना संसर्गामुळे 95 रूग्ण दगावले आहेत.

मृतांच्या संख्येत देशात तिसऱ्या स्थानी असलेल्या मध्यप्रदेशात 80 रूग्णांचा बळी गेला आहे. दिल्लीत 2 हजार 150 पेक्षा अधिक बाधित आढळले आहेत. दिल्लीतील मृतांची संख्या 47 इतकी आहे. राजस्थान, तामीळनाडू आणि मध्यप्रदेशातील बाधितांनी 1 हजार 500 चा टप्पा पार केला आहे. उत्तरप्रदेशात 1 हजार 400, तेलंगणात 900 तर आंध्रप्रदेशात 800 हून अधिक बाधित आहेत.

केरळ, कर्नाटक, जम्मू-काश्‍मीर आणि पश्‍चिम बंगालमध्येही करोनाची लागण झालेले प्रत्येकी 400 हून अधिक रूग्ण आढळले आहेत. भारतात नोंद झालेल्या करोनाबाधितांमध्ये 77 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी 25 मार्चपासून 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्या लॉकडाऊनची मुदत आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.