सातारा -सातारा शहरातील कोव्हिड रुग्णांची संख्या वाढतच असून बाधितांची एकूण संख्या 225 झाली आहे. तालुक्यातही बाधितांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालांनुसार तालुक्यात नवे 26 रुग्ण आढळले असून नागठाणेनजीकच्या सोनापूर गावातील करोनाची साखळी तुटेनाशी झाली आहे.
सातारा शहरात आठ व तालुक्यातील अन्य गावांमध्ये 18 नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी असलेली एक महिला व एक पुरुष, सदाशिव पेठेतील 25 वर्षांचा युवक, शहरातील 25 वर्षीय महिला, 51 वर्षीय पुरुष, सदरबझार येथील 19 वर्षीय युवती, गुरुवार पेठेतील 64 वर्षीय पुरुष, गोडोलीतील 45 वर्षीय महिला, असे आठ रुग्ण आढळले असताना पालिकेच्या आरोग्य विभागाने पाच रुग्ण असल्याचे सांगितले.
शनिवार पेठेतील आम्रपाली हॉटेलशेजारी वसंत विहार इमारतीतील 45 वर्षांचा पुरुष, गुरुवार पेठेतील 64 वर्षीय वृद्ध, विसावा नाका येथील 40 वर्षीय पुरुष, गोडोली व शाहूनगर येथील दोन महिला बाधित असल्याचे कोव्हिड कक्षप्रमुख प्रणव पवार यांनी सांगितले. गुरुवार पेठेतील वृद्धाचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील करोनाबळींचा आकडा चौदावर गेला आहे.
सातारा तालुक्यात जकातवाडीत 41 व 60 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, सोनापूर येथील 18 वर्षीय युवती, 12 वर्षांचा मुलगा, 54 वर्षांचा पुरुष व 40 वर्षीय महिला, तामजाईनगरात 79 वर्षीय पुरुष, वासोळेतील 52 वर्षीय पुरुष, वर्णे येथील 60 वर्षीय पुरुष, पोगरवाडीतील 39 वर्षीय महिला, कामथी येथील 51 वर्षीय पुरुष, चिंचणेर येथील 18 वर्षांचा युवक, लिंब येथील 18 वर्षांची युवती, आठ वर्षांची मुलगी, पळशी येथील 50 वर्षीय पुरुष, काटकरवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, कृष्णानगर येथील 46 वर्षीय पुरुष, यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. सातारा तालुक्यात कंटेनमेंट झोन 159 असून त्यात एकूण रुग्णसंख्या 872 झाली आहे.