बंगलुरू: कर्नाटकातील करोनाग्रस्तांची संख्या येत्या 15 ते 30 दिवसांत दुप्पट होण्याची शक्यता आहे, अशी भीती त्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच व्यक्त केली आहे.
तथापि या विषयी चिंता करण्याचे कारण नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री बी. श्रीमालू यांनी म्हटले असून त्यांनी जनतेला आरोग्य विषयक सूचना कसोशिने पाळण्याची सूचना केली आहे.
राज्यातील सध्याची करोनाग्रस्तांची संख्या 36 हजार 216 इतकी आहे. राजधानी बंगलुरूमध्ये मंगळवारपासून सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. रोज त्या राज्यात किमान दोन हजार करोना रुग्ण आढळून येत आहेत.
करोनाचा वाढता प्रसार पाहता पुढील दोन महिने कर्नाटकसाठी चिंताजनक आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे. तथापि राज्य सरकार सर्वंकष प्रयत्न करीत असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असा दिलासाही आरोग्यमंत्र्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान बंगलुरूमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्याच्या निर्णयाचे विरोधी पक्षाचे नेते एस. कुमारस्वामी यांनी स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यात ज्या ठिकाणी गंभीर स्थिती आहे त्याठिकाणीही अशाच प्रकारच्या उपाययोजनेची गरज आहे.