जवळपास 9 लाख रूग्ण झाले बरे
पॅरिस : चीनमध्ये सर्वप्रथम उद्रेक झाल्यानंतर सुमारे चार महिन्यांत करोनाची बाधा जगभरातील 30 लाखांहून अधिक रूग्णांना झाली आहे. त्यामुळे जगभरात निर्माण झालेल्या संकटातही जवळपास 9 लाख रूग्ण बरे झाल्याच्या घडामोडीने दिलासा मिळाला आहे. मागील वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरच्या समाप्तीवेळी चीनमध्ये करोनाचा उद्रेक आढळला.
त्यानंतर जगभरात फैलावलेल्या करोनाने 210 देश आणि प्रदेशांमध्ये शिरकाव केला. त्या विषाणूच्या फैलावाचा सर्वांधिक फटका अमेरिकेला बसला. त्या देशातील करोनाबाधितांची संख्या 10 लाखांजवळ जाऊन ठेपली आहे. तर, करोनाने त्या देशात 55 हजारांहून अधिक रूग्णांचा बळी घेतला आहे.
बाधित आणि बळींच्या संख्येत अमेरिका जगात पहिल्या स्थानी आहे. त्या देशापाठोपाठ इटलीत 26 हजारांहून अधिक रूग्ण दगावले आहेत. स्पेन, फ्रान्समध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या प्रत्येकी 22 हजारांहून अधिक आहे. ब्रिटनमध्येही 20 हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. करोना संसर्गामुळे बेल्जियममध्ये 7 हजारांहून अधिक रूग्ण दगावले आहेत. तर जर्मनी आणि इराणमधील मृतांचा आकडा 6 हजारांजवळ जाऊन ठेपला आहे. खंडनिहाय विचार करता करोना फैलावाचा सर्वांधिक तडाखा युरोपला बसला आहे. युरोपमधील बाधितांची संख्या जगाच्या जवळपास निम्म्याइतकी आहे. त्या खंडात करोनाने सुमारे 1 लाख 25 हजार रूग्णांचा बळी घेतला आहे.