पॅरिस – जगभरातील करोनाबाधितांच्या संख्येने 6 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्या विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 या आजाराने आतापर्यंत जगभरात 28 हजारहून अधिक बळी घेतले आहेत. जीवितहानीचा विचार करता युरोप खंडातील प्रमाण अजूनही चढेच आहे.
करोनाचा उद्रेक सर्वप्रथम चीनमध्ये झाला. आता जवळपास तीन महिन्यांनी त्या देशातील करोना फैलाव आटोक्यात आला आहे. मात्र, बाधित आणि मृतांच्या संख्येचा विचार करता चीनला इतर देशांनी मागे टाकले आहे. बाधितांच्या संख्येत अमेरिका आणि इटली या देशांनी चीनला तिसऱ्या स्थानी ढकलले आहे.
अमेरिकेतील बाधितांच्या संख्येने 1 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. तर, इटलीत 86 हजारहून अधिक बाधित आढळले आहेत. जगातील सर्वांधिक करोना बळींची नोंद इटलीत झाली आहे. त्या देशात 9 हजारहून अधिक रूग्ण दगावले आहेत. स्पेनमध्ये 5 हजारहून अधिक तर फ्रान्समध्ये सुमारे 2 हजार जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे युरोप खंडात करोनाने अक्षरश: कहर केल्याचे दिसत आहे. जगातील 199 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे त्या विषाणूशी संपूर्ण जगालाच लढावे लागत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या चाचण्यांमध्ये भारताचाही सहभाग
भारत लवकरच “कोविड-19′ या आजारावर औषध विकसित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या चाचण्यांमध्ये सहभागी होणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या, साथीचे आजार विभागाचे प्रमुख डॉक्टर रमण आर. गंगाखेडकर यांनी ही माहिती दिली.
सद्यस्थितीत विविध संशोधकांचे सुमारे 30 गट करोना विषाणूविरोधात उपचार विकसित करण्यासाठी संशोधन करत असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी भारतात करोनाबाधितांची संख्या कमी असल्याने भारत या संशोधनात सहभागी झाला नव्हता, असे त्यांनी सांगितले. यासोबतच व्यक्तिगत पातळीवर तपासणी करता येतील अशी उपकरणे विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.