अमेरिकेतील प्रमाण एक-चतुर्थांशपेक्षा अधिक
पॅरिस : जगभरातील करोनाबळींची संख्या 2 लाखांजवळ जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये अमेरिकेतील मृतांचे प्रमाण एक-चतुर्थांशपेक्षा अधिक आहे. अमेरिकेत करोनाने 52 हजारांपेक्षा अधिक बाधितांचा बळी घेतला आहे. जगभरात हाहाकार उडवणाऱ्या करोनाचा फैलाव 210 देशांत आणि प्रदेशांत झाला आहे. त्या विषाणूचा संसर्ग जगातील 28 लाखांहून अधिक रूग्णांना झाला आहे. एकट्या अमेरिकेत 9 लाखांहून अधिक बाधित आहेत.
करोनाबाधित आणि बळींची संख्या अमेरिकेत जगात सर्वांधिक आहे. बळींच्या संख्येत दुसऱ्या स्थानी असलेल्या इटलीत सुमारे 26 हजार रूग्ण दगावले आहेत. स्पेन आणि फ्रान्समधील मृतांचा आकडा 22 हजारांपेक्षा अधिक आहे. ब्रिटनमधील बळींची संख्या 20 हजारांजवळ जाऊन पोहचली आहे. बेल्जियममध्ये जवळपास 7 हजार रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. त्याशिवाय, जर्मनी आणि इराणमधील मृतांची संख्या 6 हजारांजवळ जाऊन ठेपली आहे.
खंडनिहाय विचार करता करोना संकटाचा सर्वांधिक फटका युरोपला बसला आहे. त्या खंडातील बाधितांची संख्या जगाच्या जवळपास निम्म्याइतकी आहे. युरोपमध्ये करोनाने 1 लाख 20 हजारांहून अधिक रूग्णांचा बळी घेतला आहे. करोनाचा उद्रेक सर्वप्रथम चीनमध्ये मागील वर्षीच्या अखेरीस झाला. त्यामुळे तो देश काही दिवस अक्षरश: ठप्प झाला. करोना संकटातून आता तो देश बऱ्याच प्रमाणात बाहेर आला आहे. मात्र, त्या संकटाने आता जगातील इतर देशांची झोप उडवली आहे.