पॅरिस -जगभरात कहर केलेल्या करोना फैलावाचा सर्वांधिक तडाखा बसलेल्या अमेरिकेतील बळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. त्या देशात करोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या बाधितांची संख्या 98 हजारांजवळ जाऊन ठेपली आहे.
जगभरात सुमारे 54 लाख करोनाबाधित आहेत. त्यातील 16 लाखांहून अधिक एकट्या अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेनंतर बाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवण्यासाठी रशिया आणि ब्राझीलमध्ये जणू स्पर्धा सुरू असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
रशियात 3 लाख 35 हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. तर ब्राझीलने 3 लाख 34 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, रशियाच्या तुलनेत ब्राझीलमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. रशियात करोनाने आतापर्यंत सुमारे 3 हजार 400 बाधितांचा बळी घेतला आहे. तर ब्राझीलमधील बळींची संख्या 21 हजारांपेक्षा अधिक आहे.
रशिया आणि ब्राझीलपेक्षा कमी बाधित असतानाही इतर काही देशांत मृतांची संख्या मोठी आहे. ब्रिटनमध्ये 36 हजारांपेक्षा अधिक तर इटलीत 32 हजारांपेक्षा अधिक बाधितांचा बळी गेला आहे. स्पेन आणि फ्रान्समध्ये प्रत्येकी 28 हजार करोनाबाधित दगावले आहेत.
बाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीतील पहिल्या दहा देशांमध्ये जर्मनी, तुर्की आणि इराणचा समावेश आहे. सव्वा लाखांपेक्षा अधिक करोनाबाधितांची नोंद झालेला भारत त्या क्रमवारीत 11 व्या स्थानी आहे.