बीजिंग – चीनमध्ये प्रादुर्भाव झालेल्या करोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 304 वर पोहोचली आहे. तर या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या 14,380 वर पोहोचली आहे. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. चीनमधील 31 प्रांतांमध्ये या विषाणूच्या संसर्गाची साथ पसरली आहे, असे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दैनंदिन अहवालामध्ये म्हटले आहे.
सर्व मृत्यू हुबेई प्रांतातील आहेत. शनिवारी आणखी 4,562 नवीन संशयित प्रकरणे नोंदली गेली. शनिवारी, 315 रुग्णांची प्रकृती गंभीर झाली आणि प्रकृती सुधारलेल्या 85 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. चीनच्या मुख्य भूमीवरची करोना बाधितांची एकूण रुग्णांची संख्या 14,380 वर पोचली आहे. यामध्ये हॉंगकॉंग आणि मकाऊमधील रुग्णांचा समावेश नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.
चीममधील एकूण रुग्णांपैकी 2,110 रूग्ण गंभीर अवस्थेत आहेत. तर 19,544 लोकांना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. 1, 37,594 जण अद्याप वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत, असे शिन्हुआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.