संगमनेर -संगमनेर तालुक्यात करोनाचा कहर कायम असून, कासारवाडीतून पहिल्या रुग्णाच्या रूपाने समोर आलेल्या इसमाचा आज पहाटे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संगमनेरात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत चौदावा बळी गेला आहे.
तसेच 232 जणांना बाधा झाली आहे. सद्यस्थितीत यातील केवळ 80 सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. रविवारी (दि.12) रात्री उशिरा आणखी दहा रुग्णांची भर पडली आहे.
मागील सोमवार ते रविवार या आठ दिवसांच्या कालावधीत संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 81 रुग्णांची भर घालणाऱ्या कोविड महामारीने मंगळवारी (दि. 7 जुलै) सय्यदबाबा चौकातील 70 वर्षीय इसमाच्या रूपाने बारावा बळी घेतला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी संगमनेरकरांना आणखी एक धक्का बसला.
शहरातील श्रमिकनगर परिसरातून पहिल्या रुग्णाच्या रूपाने समोर आलेल्या 57 वर्षीय इसमाचाही कोविडने बळी गेला. त्यामुळे सरता आठवडा संगमनेरकरांसाठी अत्यंत घातक ठरला. आठवडाभर एकामागून एक धक्के सहन करणाऱ्या संगमनेरकरांना आजपासून सुरू होणारा नवा आठवडा दिलासादायक ठरेल, अशीच काहीशी अपेक्षा होती. मात्र ती पूर्णतः फोल ठरली असून, आज भल्या सकाळीच संगमनेरकरांना धक्का बसला आहे.
संगमनेर शहरालगत असणाऱ्या कासारवाडी परिसरातून पहिल्या रुग्णाच्या रूपाने समोर आलेल्या 63 वर्षीय इसमाचा आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नगरला उपचारादरम्यान मृत्यू झाला.